

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी आयटी पार्क शेजारील मारुंजी (शिंदेवस्ती) येथील चौकात भरधाव आलेल्या मालवाहू डंपरने दुचाकीवरील दोघांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.14) दुपारी साडे चारच्या दरम्यान घडली.
अमराराम चौधरी (43), अशोक राम (26) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील लक्ष्मी चौकाकडून भरधाव आलेला डंपर क्र. (एमएच 14 सीपी 1638) मारुंजीच्या दिशेने भरधाव जात होता.
दरम्यान येथील शिंदे वस्ती चौकात फेज दोनच्या दिशेने आलेले दुचाकीस्वार लक्ष्मी चौकाकडे वळत असताना डंपरने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेमुळे दुचाकीस्वार डंपरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे.