नंदकिशोर चतुर्वेदी : उद्धव ठाकरेंचा ‘श्रीजी होम’ कंपनीशी काय संबंध; किरीट सोमय्यांचा सवाल | पुढारी

नंदकिशोर चतुर्वेदी : उद्धव ठाकरेंचा 'श्रीजी होम' कंपनीशी काय संबंध; किरीट सोमय्यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ठाकरे परिवाराशी संबंधित असणारा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठं लपवून ठेवले आहे? त्याला फरार घोषीत करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावं. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याबाबत मुख्यमंत्री गप्प का? चुतर्वेदीचे ठाकरेंसोबत व्यवहार आहेत. २९ कोटींचा गैरव्यवहार झाला आहे”, असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चतुर्वेदींच्या १२ कंपन्यांची यादी पत्रकारांसमोर सादर केली.

“उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची श्रीजी होम कंपनी आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की, त्यांचा या कंपनीशी काही संबंध नाही. माझ्यावर आरोप करणारे प्रवीण कुलमे कुठे आहेत? ते देशातून बाहेर गेले का? त्यांना जितेंद्र आव्हाडांनी मदत केली का? यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार का? ठाकरे कुटुंबांचे नंदकिशोर चतुर्वेदीशी व्यवसायिक संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मेहुणे पाटणकर यांच्यासोबत व्यवहार झालेले आहेत”, असा आरोपही सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आहेत.

“या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी उत्तर द्यावं. प्रवीण कलमे यांना कोण वाचवत आहे? १५ दिवस कलमे नाहीत, त्यांना फरार घोषीत करायला हवे. कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत. त्यांचा एफआयआर दाखल झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत. तसेच चतुर्वेदीसंदर्भात दिल्लीत पाठपुरावा करणार आहे. कारण, त्यांच्या कंपनीद्वारे मनी लाॅन्ड्रिंग झाले आहेत”, असा आरोप सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लावले आहेत.

आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्यांवर टाॅयलेट घोटाळा केला आहे, असा आरोप केला. त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला असता सोमय्या म्हणाले की, “संजय राऊतांना माझ्यावर आरोप केले. पण, त्यांनी कागद दाखवला नाही. जेव्हा ते पुरावे दाखवतील तेव्हाच मी त्यांना उत्तर देईन.”

Back to top button