पुणे पोलिस : चोरावर मोर होणारा ‘तो झिरो पोलिस’ जाळ्यात ! | पुढारी

पुणे पोलिस : चोरावर मोर होणारा 'तो झिरो पोलिस' जाळ्यात !

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसापुर्वी बाणेर परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली. त्यावेळी एका झिरो पोलिसाला अटक करण्यात आली. प्रवीण दुरगुडे (वय.२५,रा.दिघी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी जेव्हा स्पा सेंटरवर छापा मारला त्यावेळी दुरगुडे हा देखील तेथे आला होता. त्याला वरिष्ठ पुणे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी आपण कोण असे विचारले असता, त्याने चक्क आय अ‍ॅम क्राईम ब्रँच ऑफिसर असे म्हणत खऱ्या पोलिसांनाच दम भरला. सद्या तो पोलिस कोठडीत असून, ९ तारखेपर्यंत त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

दुरगुडे याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. तो हा शहरात पोलिस कर्मचारी असल्याची बतावणी करत फिरत असल्याचे आढळून आले आहे. एखाद्या पोलिस कर्मचार्‍याला लाजवेल असा त्याचा पेहराव होता. डोक्याला टोपी, पायात वर्दीवर अधिकारी वापरतात तसा बुट, डोळ्याला काळा गॉगल बोलण्याची लकब थेट पोलिसासारखीच. त्यामुळे इतरांना तो पोलिसच असल्याचे वाटत असे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसापासून तो शहरातील अवैध धंदे व स्पा सेंटरवर गुन्हे शाखेचा पोलिस असल्याची बतावणी करून महिन्याकाठी मोठी माया जमवत होता. प्रत्येक स्पा सेंटरकडून तो महिन्याकाठी दहा हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तो ज्या ठिकाणी जात असे तेथे तो कॅमेर्‍यात न येण्याची काळजी घेत असे. एवढेच नाही तर कधी अजिंक्य शिंदे तर कधी सुजित चव्हाण अशी वेगवेगळी नावे धारण करून तो शहरात वावरत होता. पोलिस खात्याची चांगलीच माहिती त्याला आहे. कोण कशा प्रकारे काम करते हे तो जाणतो. त्यामुळे अनेक दिवसापासून त्याचा चोरावर मोर होण्याचा हा खेळ सुरू होता.

पुणे पोलिस : त्याचा खात्यातील मास्टरमाईंड कोण ?

झिरो पोलिस म्हणून शहरातील अवैध धंद्यातून वसुली करणारा दुरगुडे हा एकटा नसावा. किंवा तो एकटा हे धाडस निश्चितच करणार नाही. त्याच्या पाठीमागे कोणी तरी खात्यातीलच गॉडफॉदर असणार हे तेवढेच खरे. शहर पोलिस दलातील काही वसुलीबहाद्दर कर्मचार्‍यांसाठी तो काम करत असल्याची माहिती आहे. त्यातील एक पोलिस कर्मचारी एका बड्या अधिकार्‍याकडे काम करतो आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा हा गोरखधंदा चालू असल्याचे दिसून येते. त्याला अनेकदा पकडण्याचे प्रतत्न विफल झाले.

मोबाईल क्रमांकही क्राईम ब्रँच नावाने सेव्ह

गुन्हे शाखेचा कर्मचारी म्हणून मिरवत असताना त्याने मोबाईलमध्ये त्याचा क्रमांक क्राईम ब्रँच नावाने सेव्ह केलेला आहे. तर पोलिसांनी वेश्यव्यावसायाच्या कारवाईत पकडलेल्या मुख्य आरोपीच्या मोबाईलमध्ये देखील त्याचा क्रमांक त्याच नावाने सेव्ह केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

असा अडकला जाळ्यात..

मंगळवारी (दि.०५) दुपारी साडे तीनच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाने बाणेर येथील डिव्हाईन स्पा सेंटरवर सुरू असलेल्या वेश्याव्यावसायावर छापा टाकला. कारवाई सुरू असताना, तो तेथे फिरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिस निरीक्षक पुराणिक यांच्या नजरेने त्याला अचूक हेरले. काही वेळात तो स्पा सेंटरवर आला. कदाचीत त्याला छापा पडल्याची माहिती नसावी म्हणूनच त्याने पोलिसी आवेशात खऱ्या पोलिसांनाच दम भरत येथे काय चालू आहे असे विचारले.

त्यावेळी पुराणिक यांनी त्याला आपण कोण अशी विचारणा केली. दुरगुडे याने चक्क आय अ‍ॅम क्राईम ब्रँच ऑफिसर अशी बतावणी केली. मात्र पुराणिक यांच्या समोर त्याचा बनाव जास्तवेळ टिकला नाही. अखेत त्याने तो तोतया पोलिस असल्याची कबुली दिली.

Back to top button