दिप्ती काळे मृत्यू प्रकरण : सीआयडीकडून चौकशी सुरू | पुढारी

दिप्ती काळे मृत्यू प्रकरण : सीआयडीकडून चौकशी सुरू

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : दिप्ती काळे मृत्यू प्रकरण सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) ससून रुग्णालयात जाऊन चौकशी केली. काळे पडलेल्या इमारतीची सीआयडीकडून पाहणी करण्यात आली. तसेच ती नेमकी कशी पडली की इतर काही घातपात झाला या दृष्टीने देखील चौकशी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काळे हिच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर ही घटना घडली होती.

दिप्ती काळे मृत्यू प्रकरण पुण्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पोलिस महासंचालकांना एक अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये गंभीर नोंदी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीआयडीच्या चौकशीला महत्व प्राप्त झाले आहे.

शहरातील ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात दीप्ती सरोज काळे (रा . ज्ञाती इक्वोटेरियम, बावधन) आणि निलेश उमेश शेलार या दोघांवर गुन्हा दाखल होता. तसेच, काळे हिच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात काळे हिच्यावर मोक्काची कारवाई केली होती. तिला अटक करण्यात आली होती. काळे हिला अटक केल्यानंतर आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते.

त्यानुसार काळे हिच्यावर ससूनच्या आठव्या मजल्यावर उपचार सुरू होते. 27 एप्रिल रोजी काळे हिचा मृतदेह इमारतीच्या खाली पडलेला दिसला. पाहणी केल्यानंतर ती हॉस्पिटलच्या खिडकीतून पळून जाताना खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

दिप्ती काळे मृत्यू प्रकरण : बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. काळे ही पोलिसांच्या ताब्यात असताना तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणात तिच्या मृत्यूची चौकशी सीआयडीकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सीआयडीच्या पथकाने सोमवारी ससून रुग्णालयात जाऊन चौकशी केली. काळे हिला ठेवण्यात आलेल्या वॉर्ड, तिचा मृतदेह सापडलेले ठिकाण, वॉर्डची खिडकी अशा सर्व गोष्टींबाबत सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.

एक प्रकारे घटनेची उजळणी करण्याचा प्रयत्न सीआयडीकडून करण्यात आला आहे. या चौकशीनंतर सीआयडी आपला अहवाल सादर करणार आहे. काळेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या तपासत ती रुग्णालयातून पळून जात असताना इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अशातच सीआयडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Back to top button