पिंपरी : उद्योगनगरीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरात विजय निर्मल गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक व हवन करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, साई अबोली महिला भजनी मंडळ, श्री सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, श्री सिद्धेश्वर महाराज भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सुरश्री भक्ती संध्या हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
महाआरतीनंतर नादवेध प्रस्तुत भक्ती भाव रंग हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, दीपक बिरादार, प्रा. हरिनारायण शेळके, संतोष शेळके अर्चना तउंदकर, अंजली देव, सारिका रिकामे, नीलिमा भंगाळे, शरण अवसेकर, शेखर पाडळकर, क्षमा काळे आदींनी केले.
पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील बुकाव उल्फ कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंदिरात अभिषेक महाआरती महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्दळीवनातून प्रकट झालेले महाराज साकारण्यात आले होते.
राजे शिवाजी नगर स्पाईन रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर भुपाळी आरती स्वामी समर्थांना अभिषेक, स्वामी चरित्र पारायण, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मठात फुलांची सजावट करण्यात आली होती.
सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महेश पोळ, देविदास भोंग, विश्वनाथ पवार, संजय मामडगे, बंडू जमदाडे यांनी केले.
प्राधिकरण सेक्टर नंबर 26 येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त अभिषेक होम-हवन महाआरती व प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

