भिगवण : डीजे तालावर नाचताहेत दीड हजार, तर भोगताहेत 25 हजार

भिगवण : डीजे तालावर नाचताहेत दीड हजार, तर भोगताहेत 25 हजार
Published on
Updated on

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : सण, जयंती, उत्सव साजरे करताना अलीकडे त्याला धार्मिक ध्रुवीकरणाचा मोठा अजेंडा मिळत असल्यामुळे सध्या कर्णकर्कश आवाजामध्ये सण, उत्सव साजरे केले जात आहेत आणि मूळ परंपरेची 'ऐशीतैशी' केली जात आहे, याचे चित्र शनिवारी रात्री भिगवणमध्ये दिसले. दीड हजार पोरं कानामध्ये बोळा टाकून बेधुंदपणे डीजेच्या दणदणाटावर नाचत होते आणि त्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास 25 हजार लोकांना होत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी या उत्सवाचे रूपांतर मोठ्या वादात झाले असते. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली आणि एक मोठा अनर्थ टळला.

डीजेची दणदणाट आणि त्यावर लावल्या जाणार्‍या गाण्यांच्या वादाची ठिणगी येथील एका चौकात पडली. मात्र, या मिरवणुकीत काहीतरी गडबड होणार होती, याची चाहूल चार दिवस आधीच पोलिसांना लागली होती. त्यामुळे सावध असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत वातावरण बिघडू लागल्याचे लक्षात घेत काहींची उचलबांगडी केली. या प्रसंगी निर्माण झालेला तणाव बरेच काही सांगून जाणारा ठरला.

वास्तविक, शनिवारी डीजेच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता. या उत्सवाला राजकीय किनार असल्याने ग्रामस्थही चिडीचूप होते. मात्र, सायंकाळी डीजेच्या आवाजाने सामान्य नागरिकांच्या कानाचे पडदे फाटू लागले तेव्हा मात्र नागरिकांचा राग अनावर झाला होता. त्यातही वयोवृद्ध, आजारी रुग्ण, लहान बालक यांच्या चिंतेत भर पडली होती. इकडे सामाजिक भान विसरून डीजेसमोर नाचणारी तरुणाई कानात बोळे टाकून बेधुंद थिरकत होती.

भिगवणमध्ये विविध सण, जयंती, उत्सवाला महापुरुषांच्या विचारला साजेशा सामाजिक कामावर भर देण्याऐवजी डीजेच्या तालावर थिरकण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. याला आता राजकीय व जातीय रंग चढू लागला आहे. यातून तरुणांचा अंतर्गत वाद धुमसण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच यावर पावले उचलणे गरजेचे बनले आहे. पोलिस, प्रशासन व राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणाच तरुणाईच्या हुल्लडबाजीला कारणीभूत ठरतोय की काय, असेही बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news