पुणे: पीएमपीला पीएमआरडीएकडून 500 सीएनजी बस व पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेकडून 500 सीएनजी बसेस तसेच जीसीसी तत्त्वावर 500 ई- बस अशा एकूण 1500 बसेस उपलब्ध करून देणार आहे. तसेच, पीएमआरडीएकडून 500 सीएनजी बससाठी लागणारा 230 कोटी रुपयांचा निधी पीएमपीकडे वर्ग केला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पीएमपीच्या ‘चर्होली’ व ‘माण’ या दोन नवीन ई- बस डेपोंच्या उद्घाटनप्रसंगी चर्होली ई-बस डेपोमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापू पठारे, पिंपरी- चिंचवड मनपाचे माजी महापौर योगेश बहल, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार- पवार व अन्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकपर भाषणात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुधोळ- मुंडे यांनी पीएमपीच्या सद्य:स्थितीचा आढावा सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार- पवार यांनी आभार मानले.
अजित पवार म्हणाले...
लाखो लोक नोकरी, शिक्षण व रोजगाराच्या शोधात पुणे शहरात येत असतात. त्यांना बससेवा देण्यासाठी पीएमपीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे साधन उपलब्ध आहे.
उन्हाच्या वाढत्या पार्यावर टिप्पणी करताना श्रीमंत माणूस स्वतःच्या एसी गाडीतून फिरतो. परंतु, कॉमन मॅन एसी बसमधून फिरला पाहिजे, यासाठी सीएनजी बस एसी असाव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या.
चर्होली उपनगराची सध्याची लोकसंख्या 1.50 लाख असून 2041 साली ही लोकसंख्या 10.50 लाखांवर तर पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या 61 लाखांवर जाईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहतूक समस्यांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘चर्होली’ व ‘माण’ या दोन नवीन ई-बस डेपोंच्या माध्यमातून प्रदूषण कमी होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असणार आहे.
ग्रीन महाराष्ट्र ही संकल्पना या दोन ई-बस डेपोंच्या माध्यमातून पुढे येत आहे.
पीएमपीमधील 240 दिवस पूर्ण केलेल्या 1741 कर्मचार्यांना कायम केले.
2020 मध्ये 1465 पीएमपी कर्मचार्यांना कायम केले.
पीएमपी कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा 68 महिन्यांचा फरक चार टप्प्यांत देण्यात येणार असून त्यापैकी एक हप्ता देण्यात आला आहे.
पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पीएमपी व मेट्रो या सार्वजनिक प्रवासी वाहतूक पुरविणार्या संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पीएमपीचे चर्होली व माण हे दोन नवीन ई- बस डेपो म्हणजे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना गती देणारा नवा टप्पा आहेत.