

सासवड: पहलगाम येथील हल्ला जाती-धर्माला धक्का नसून, तो भारताला धक्का आहे. देशावर संकट आल्यावर राजकारण बाजूला ठेवून आम्ही सरकारबरोबर आहोत. बाकीचे राजकारण आम्ही निवडणुकीत करू, परंतु देशावर संकट आल्यावर आम्ही सर्व एकत्र आहोत, असे स्पष्ट मत रविवारी (दि. 27) पुरंदर तालुक्यातील सासवड येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केले.
या ठिकाणी ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या 81 व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माजी शरद पवार बोलत होते. खा. पवार म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. जे घडलं ते देशाला एक धक्का होता. भारतावर हल्ला होता.
राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण जेव्हा असा देशवासीयांवर हल्ला होतो, अशावेळी मतभिन्नता नाही, असे खा. पवार यांनी स्पष्ट केले. आम्हाला लोकांनी विचारलं, काय भूमिका घ्यायची? देशात झालेला हा हल्ला पाहता या गोष्टींचा विचार करता येईल. काही चुका असतील-नसतील. हे नंतर पाहूया. आज सगळे एक होऊया, असेदेखील ही पवार म्हणाले. काही लोक याला धर्माचा रंग देतात, हे देशाच्या हितासाठी हानिकारक आहे, असेही पवार यांनी सांगितले.