Nira River Boy Drowned: पंधरा वर्षीय मुलगा निरा बंधाऱ्यावरून पाण्यात गेला वाहून
इंदापूर: जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या नीरा स्नानाच्या अगोदर नीरा नदीकाठी एक दुर्घटना घडली. इंदापूर तालुक्यातील सराटी आणि अकलूजला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यातून मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद कल्याण फोके हा १५ वर्षीय मुलगा आंघोळीला नदीत गेल्यानंतर पाण्यात वाहून गेला.
गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी आहे. तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्या सोबत संत तुकोबांच्या वारीत चालत होता. (Latest Pune News)
निरा नदीजवळ असलेले बारामती तालुक्यातील मोरगाव येथील होमगार्ड कर्मचारी राहुल अशोक ठोंबरे यांनी महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर क्षणाचा विलंब न करता नदीमध्ये उडी टाकली. दोन वेळा त्याला हाताला धरून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या अतिवेगामुळे तो प्रयत्न निष्फळ ठरला. होमगार्ड एका बाजूला पाण्यातून फेकले गेले तर तो मुलगा पाण्याच्या वेगात पुढे वाहून गेला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक
अभिजीत कणसे म्हणाले, नदीमध्ये आंघोळीला गेलेला हा मुलगा वाहून गेला असून त्याला शोधण्यासाठी स्थानिक व एनडीआरएफचे जवान पोलीस शोध कार्य करीत आहेत.
आजीचा आक्रोश
आमची ही दुसरी वारी असून आंघोळीला आम्ही बरोबरच नदीकाठी आल्यानंतर तो पाण्यात गेला आणि पाण्याच्या वेगाच्या भोवऱ्यात अडकला. मी आरडाओरडा केला त्यावेळी काहींनी नदीमध्ये उड्या टाकल्या तर काहींनी शोध घेतला; मात्र तो अद्यापपर्यंत आढळून आला नाही, असे सांगताना आजीला गहिवरून आले होते.

