

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकत परस्पर विकून 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गॅलेक्सी कन्सन अॅण्ड कॉन्ट्रक्टर्सचे संचालक अशोक शिवनारायण थेपडे आणि अमित अशोक थेपडे (दोघेही रा. डी. 22, मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अमित थेपडे यांना अटक केली आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक विजय अगरवाल यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2006 ते फेब—ुवारी 2023 या कालावधीत घडला.
अगरवाल यांची सिद्धिविनायक दुर्गादेवी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. कंपनीने 2000 मध्ये पाषाण येथील 26 गुंठे जमीन करारनाम्याने विकसनासाठी घेतली होती. त्यांनी ही जमीन 2006 मध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अॅण्ड कॉन्ट्रक्टरच्या संचालकांना भागीदारीत कराराने विकसनासाठी दिली. करारानुसार बांधकाम गहाण ठेवणे किंवा त्यावर बँकेतून कर्ज काढण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, बांधकाम नकाशे मंजूर झाल्यापासून 15 महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. करारनाम्यात ठरल्यानुसार बांधकाम पूर्ण करून दिले नाही, त्यामुळे मुदतवाढ दिली होती. तसेच, कोणत्याही तिसर्या व्यक्तीस ताबा देण्याचे अधिकार कंपनीला दिले नव्हते. मात्र, गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन मजल्यांची परवानगी असताना, सातमजली इमारतीचा बनावट बांधकाम नकाशा तयार केला. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे, असे भासवून पिंपरी-चिंचवडमधील एका बँकेकडून त्यावर दोन टप्प्यांत 24 कोटींचे कर्ज घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.