

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : महाराष्ट्रातच मराठी भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. मराठीत सही असेल तर चेकबुक मिळणार नाही, असा अजब फतवा पोस्टाने काढला आहे.
या अजब फतव्यामुळे खातेदारांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा स्वरूपाच्या जाचक अटी पोस्ट खात्याने खातेदारांवर लादू नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अमृताहून गोड असलेली मराठी ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचे कौतुक करताना म्हणतात की,माझ्या मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन महाराष्ट्रात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळावे यासाठी वेळोवेळी आवाज उठवून आंदोलने करण्यात आली होती.
मराठी भोषबाबत आंदोलने करूनही महराष्ट्रातच भाषेची गळचेपी होताना दिसत आहे.मराठीत सही असेल तर चेकबुक मिळणार नाही, असा फतवा भोसरी गाव पोस्टाने काढला आहे.
भोसरीतील एका नागरिकाने यासंदर्भात आपले नाव न सांगता ही माहिती दिली. पोस्टाच्या या अजब फतव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोस्ट खात्याच्या या अजब कारभाराबद्दल खातेदारांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मराठीत सही असेल तर चेक बुक मिळणार नाही, हा नियमच आहे. सही रनिंग हॅन्डमध्ये लागते. मराठीत कोणीही लिहू शकतो.
-महेश भालेराव
(पोस्टमास्तर, भोसरी गाव)
मराठीत सही असेल तर चेक बुक मिळणार नाही असा काही नियम असेल असे मला वाटत नाही. तरीही या संदर्भात संबंधितांकडून माहिती घ्यावी लागेल.
-के. एस. पारखी (जनसंपर्क अधिकारी )