मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खंडाळा बोरघाटात केमिकलचा टँकर पलटी, ६ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा | पुढारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खंडाळा बोरघाटात केमिकलचा टँकर पलटी, ६ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

लोणावळा : पुढारी वृत्‍तसेवा; पुणे-मुंबई एक्स्प्रेस मार्गावर खंडाळा बोरघाटात जुन्या अमृतांजन पुलाच्या पुढील वळणावर एक केमिकल टँकर पलटी झाल्याने एक्सप्रेस हायवेवर वाहतूक ठप्प झाली. या अपघातामुळे दुतर्फा वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर केमिकल टँकर पलटी झाला. यामुळे टँकर मधील सर्व केमिकल रस्त्यावर सांडले. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा परिणाम मुंबई हून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवरही झाला असून, त्या लेनवरही वाहतूक खोळंबली आहे. एक्सप्रेस हायवे बंद झाल्याने वाहने जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहारत देखील मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी झाली असून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे.

पलटी झालेला टँकर तसेच रस्त्यावर सांडलेले केमिकल काढण्यासाठी महामार्ग पोलीस, आयआरबी आणि देवदूत हे प्रयत्न करीत असून, पुढील काही वेळेतच रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button