चोरीची अनोखी शक्कल, सराफाच्या दुकानाशेजारी दुकान भाड्याने घेतले अन् भिंतीला भगदाड पाडून सोने लुटले | पुढारी

चोरीची अनोखी शक्कल, सराफाच्या दुकानाशेजारी दुकान भाड्याने घेतले अन् भिंतीला भगदाड पाडून सोने लुटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भरदिवसा भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफाच्या दुकानावर हात साफ केला. ही घटना (शुक्रवारी) दुपारी सव्वादोन ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास वारजे एनडीए रस्ता लक्ष्मी माथा येथील माऊली ज्वेलर्स या सराफी पेढीत घडली. चोरट्याने दुकानातून एक किलो पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येतो आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी भेट दिली.

अद्याप सराफाला दुकानातून किती किमतीचा ऐवज चोरी गेला आहे याची माहिती नाही. त्यामुळे चोरी गेलेल्या दागिन्यांचे मोजमाप करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शेजारी मसाला व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेऊन काम सुरू करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मागील काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या सराफाच्या दुकानाशेजारी एक दुकान भाड्याने घेतले होते. तेथे त्यांना मसाल्याचे दुकान सुरु करायचे होते. त्यामुळे त्यांनी दुकानात फर्निचरचे काम सुरू केले होते. नवीन दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरू असल्याने चोरट्यांचा नागरिकांना संशय आला नाही. शुक्रवारी दुपारी माऊली सराफ पेढी बंद होती. याच संधीचा फायदा घेत, चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले.

त्यानंतर तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. दुकानात काम सुरू असल्यामुळे भिंतीला भगदाड पाडत असल्याचा आवाज आला नाही. जरी आवाज आला तरी काम सुरू असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. दरम्यान जेव्हा ज्वेलर्सचे मालक दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथके व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

एक किलो पेक्षा अधिक वजनाचे दागिने दुकानातून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुकान भाड्याने घेणारे कोण आहेत? त्यांनी ते कधी भाड्याने घेतले? फर्निचरचे काम कोण करत होते? नेमकी चोरी कोणी केली अशी विविध माहिती पोलिस घेत आहेत.

Back to top button