पुणे : शाळेत घुसून ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

पुणे : शाळेत घुसून ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका मुलींच्या शाळेत घुसून नराधमाने 11 वर्षांच्या मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 23) सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

एकतर्फी प्रेमातून वडगाव शेरी परिसरातील शाळेत शिरून दहावीतील मुलीवर खुनीहल्‍ला केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शालेय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी एका 40 वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्‍तीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. गेटवर सुरक्षा रक्षकदेखील तैनात असतात. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. प्राथमिक माहितीनुसार, शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नसल्याचे दिसून येते. याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. तरी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 11 वर्षांची मुलगी बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. यावेळी एकजण शाळेत आला. त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरूममध्ये नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर ‘बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ,’ अशी धमकी देऊन तो तेथून पसार झाला.

दरम्यान, घटनेनंतर या मुलीने तिच्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले.

पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शाळेकडे तातडीने धाव घेत घटनेची माहिती घेतली. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचार्‍यांकडून माहिती घेऊन ते आरोपीचा माग काढत आहेत. पोलिस उपनिरीक्षक मनीषा जाधव अधिक तपास करीत आहेत.

शाळेतील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

पंधरा दिवसांतच शाळेतील मुलींसंदर्भात दोन गंभीर घटना घडल्या आहेत. येरवड्यात एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून केलेला चाकूहल्‍ला आणि त्यानंतर ही बलात्काराची घटना. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा घटना वेळीच रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून येते.

अत्याचारी नराधमाचे रेखाचित्र जारी

दरम्यान, मुलीवर अत्याचार करून फरारी झालेल्या नराधमाचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. रेखाचित्रातील वर्णनानुसार पोलिस आरोपीचा माग काढत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची व मुलींची शाळा शेजारी-शेजारी आहे. मध्ये एक गेट आहे. हा आरोपी मुलींच्या शाळेत कसा आला, याचा तपास सुरू आहे.

अत्याचारी नराधमाला शाळेतील 3 ते 4 मुलींनी पाहिले आहे. पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. त्याआधारे तपास करण्यात येत आहे. पीडित मुलगी शाळेत आली, त्याच्या अगोदर हा नराधम शाळेच्या जिन्यात थांबला होता. त्याने या मुलीचे आडनाव उच्चारून मी तुझ्या वडिलांना ओळखतो, असे म्हणून तिच्या वडिलांशी मोबाईलवर बोलत असल्याचा बहाणा केला. यावेळी तेथे असलेल्या 3-4 मुलींनी त्याला पाहिले.

तो तिच्याशी बोलत असल्याने ओळखीचा असावा, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्याने तिला दुसर्‍या मजल्यावर नेत, बाथरूम कोठे आहे, असे विचारले. तेथे गेल्यावर तिला आत ढकलून तिच्यावर अत्याचार केला. शाळा व शाळेच्या परिसरात 57 कॅमेरे असल्याची माहिती आहे. मात्र, त्यातील केवळ तीन ते चार कॅमेर्‍यांत रेकॉर्डिंग होते. इतर कॅमेर्‍यांत रेकॉर्डिंग होत नसल्याचे आढळून आले आहे.

Back to top button