पिंपरी : बाईपन न देगा देवा; सहा महिन्यांत 143 बलात्कार

पिंपरी : बाईपन न देगा देवा; सहा महिन्यांत 143 बलात्कार
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : शहरातच नाही, तर राज्यात सगळीकडेच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसर मागील सहा महिन्यांत 143 बलात्कार आणि 229 महिलांचा विनयभंग झाल्याची नोंद आहे. नाहक त्रास सहन करावा लागल्याने बाईपण न देगा देवा..!, अशीच काहीशी परिस्थिती पीडित महिलांची असल्याची दिसून येत आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतात. मात्र, अलीकडे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ होऊ लागली आहे. शहर परिसरात मागील सहा महिन्यांत 143 महिलांवर बलात्कार करण्यात आला आहे. तर, 229 महिला विनयभंगाच्या शिकार बनल्या आहेत.

…म्हणून आकडा फुगतोय

न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलिसांनी महिलांची तक्रार तत्काळ नोंदवून घेणे बंधनकारक आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक प्रकरणे पोलिसांच्यादेखील अंगलट आली आहेत. त्यामुळे पोलिसही घटनेची शहानिशा न करता गुन्हे नोंदवून घेत आहेत. अनेक प्रकरणांत पोलिसांना सत्य परिस्थिती माहिती असूनही त्यांना नाइलाजस्तव गुन्हे दाखल करावे लागत आहेत. त्यामुळेच गुन्ह्यांचा आकडा फुगत असल्याचे पोलिस अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात.

'त्या' चिमुरड्यांची चूक काय?

सांगवी येथे एका गुन्ह्यात सख्ख्या चुलत्यानेच चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नराधम चुलता घरी आल्यानंतर मयत चिमुरडी 'चाचा आये…चाचा आये' असे म्हणून त्याला बिलगायची. त्याच्याकडे तासन्तास 'ती' त्याच्याबरोबरच रहायची. त्यामुळे तो काही करेल, असे तिच्या आई-वडिलांना कधीही वाटले नाही. तसेच, भोसरी येथील एका प्रकरणात बापानेच पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले. नराधम बाप घरी आल्यानंतर चिमुरड्या आनंदाने उड्या मारत. बाप कामाच्या शोधात बाहेर जात असताना अनेकदा या चिमुरड्या बापाजवळ बालहट्ट करीत असल्याचे शेजार्‍यांनी पहिले होते. न कळत्या वयात असह्य वेदना मिळालेल्या चिमुरड्यांची चूक काय, असा प्रश्न या निमित्ताने
विचारला जात आहे.

पोलिसांवर मोठी जबाबदारी

संसाराचा गाडा हाकण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांची संख्या पिंपरी- चिंचवडमध्ये जास्त आहे. आयटी कंपनीत काम करणार्‍या तरुणींची शहरात नियमित वर्दळ असते. अशा महिलांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी पोलिस दलावर आहे.

दोषसिद्धी कमी असल्याने फावतेय

महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातात. मात्र, स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाबीतीचे प्रमाण कमी असण्यामागे हेतूपुरस्सर दिल्या जाणार्‍या (टेक्निकल) तक्रारी, हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे जाणकार सांगतात. ज्यामुळे खर्‍या गुन्हेगारांचे फावल्याचे समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news