पिंपरी : संतोष शिंदे : न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या पंधरा पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 165 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
त्यामुळे आता पोलिसांच्या कारभारावरही तिसर्या डोळ्याची नजर असल्याचे बोलले जात आहे.आठ वर्षांपूर्वी वडाळामध्ये एका तरुणाचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या छळवणुकीत मृत्यू झाल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
तरुणाच्या संशयित मृत्यूमुळे पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींवर होणार्या शारीरिक अत्याचाराचा मुद्दा समोर आला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश जारी केले.
दरम्यान, सर्व पोलिस ठाण्यांत कॅमेरे लावण्यासंदर्भातील प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी दिला. त्यानुसार, गृह विभागाने सर्व पोलिस ठाण्यांमध्ये कॅमेरे लावण्याच्या खर्चाला मान्यता दिली.
पोलिस ठाण्यात कॅमेरे कोठे बसवावे, कॅमेर्यांमधील दृश्यांवर नजर ठेवण्यासाठो पोलिस ठाणे प्रमुखांच्या दालनात व्यवस्था असावी, कॅमेरांमधील 'डेटा स्टोरेज' किती दिवसांसाठी असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने सर्व पोलिस ठाण्यांना घालून दिली आहेत. या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत पिंपरी-चिंचवड येथील पोलिस ठाण्यात कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पोलिस ठाण्यात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे पोलिसांच्या तपासावर मर्यादा आल्या आहेत. यापूर्वी चौकशीसाठी उचललेल्या गुन्हेगाराला नियमबाह्य पद्धतीने ठाण्यात बसवून ठेवले जात होते.
मात्र, आता कॅमेर्यामुळे संशयितांना ठाण्यात बसवून ठेवणे अवघड झाले आहे. तसेच, पोलिसांना भेटण्यासाठी येणार्या राजकीय पदाधिकार्यांची देखील कोंडी झाली आहे.
दरम्यान, राज्यातील काही पोलिस ठाण्यातील कॅमेरे जाणीवपूर्वक बंद ठेवल्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळे प्रभारी अधिकारी अलीकडे कॅमेरे बंद ठेवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एकंदरीतच ठाण्यातील कॅमेरे पोलिसांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर चांगल्या प्रतीचे कॅमेरे आहेत. तसेच, पोलिस ठाण्यातील खोल्यांमधील आवार, ठाणे अंमलदार खोली, पोलिस अधिकार्यांच्या खोल्या, चार्ज रूम, लॉकअप व अन्य सर्व आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पोलिस - ठाणे कॅमेर्यांची संख्या भोसरी - 08 पिंपरी - 14 चिंचवड - 16 निगडी - 10 आळंदी - 10 चाकण - 10 दिघी - 10 म्हाळुंगे - 14 सांगवी - 10 वाकड - 10 हिंजवडी - 15 चिखली - 08 देहूरोड - 10 तळेगाव दाभाडे - 10 तळेगाव एमआयडीसी - 10 एकूण - 165