pune crime : राष्ट्रपती पदकासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून फसवणूक | पुढारी

pune crime : राष्ट्रपती पदकासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून फसवणूक

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलिस कर्मचारी गणेश जगतापसह लीपिकावर वानवडी पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (pune crime)

गणेश अशोक जगताप, नितेश अरविंद आयनुर,रविंद्र धोंडीबा बांदल व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २६ जुलै २०१७ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार गणेश जगताप हे २०१७ ते २०२० या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. तर, याच कालावधीत पोलीस आयुक्त कार्यालयमधील गोपनीय शाखेत कनिष्ठ लिपिक म्हणून आयनुर व वानवडी पोलीस ठाण्याचा समावेश असलेल्या परिमंडळ ५ मध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून रवींद्र बांदल नेमणुकीस होते. या दोन्ही लीपिकांच्या मदतीने हवालदार जगताप यांनी सेवापुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून खोटा दस्त तयार केला. (pune crime)

त्यावर बनावट सह्या करून सरकारी शिक्यांचा गैरवापर करीत दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा झाली असतानाही, त्याबाबतचे रेकॉर्ड नष्ट करून बेकायदेशीररीत्या फायदा करून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, १३ फेब्रुवारी २०१८ साली हवालदार जगताप यांना शिक्षा झाली होती.

या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील ‘डे- बूक’ कर्मचाऱ्यांची असतानाही त्यांनी कर्तव्य न बजावता जगताप यांना मदत केल्याचे आढळून आले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Back to top button