नारायणगाव : यात्रा हंगामासाठी तमाशा पंढरी सज्ज ! कोरोनाच्या अडकित्त्यात अडकलेली सुपारी फुटणार | पुढारी

नारायणगाव : यात्रा हंगामासाठी तमाशा पंढरी सज्ज ! कोरोनाच्या अडकित्त्यात अडकलेली सुपारी फुटणार

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : तमाशाची (tamasha) पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव (ता. जुन्नर) नगरीत सभापती कॉर्नरच्या समोरील बाजूस यंदाच्या यात्रा, उत्सवाच्या सुपारी घेण्यासाठी अनेक तमाशा फड मालकांच्या राहुट्या उभ्या राहिल्या आहेत. एकंदरीत यात्रा हंगामासाठी तमाशा पंढरी नारायणगाव आता सज्ज झाली आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. चालू वर्षी शासनाने परवानगी दिल्याने तमाशा कलावंतांना आपली कला सादर करून दोन रुपये मिळणार आहे. आई मुक्ताई यंदाचा यात्रा हंगाम निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी मागणी तमाशा फड मालकांनी नारायणगावचे आराध्य दैवत आई मुक्ताई चरणी केली.

नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे व ग्रामस्थ यांच्या मदतीने यंदा तमाशा (tamasha) राहुट्यासाठी सभापती कॉर्नरच्या समोरील बाजूस जागा उपलब्ध करून देण्यात आली असून या ठिकाणी श्रीमती महाजन, अतुल कानडे, हेमंत डोके यांनी आपली जागा मोफत दिली. ग्रामस्थांच्यावतीने जागेची साफसफाई, पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी आजमितीला एकूण ३५ फड मालकांनी आपल्या राहुट्या लावल्या आहेत.

यामध्ये प्रसिद्ध फडमालक विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे यांच्यासह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बडे, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, काळूबाळू, भीका भीमा सांगवीकर, आनंद लोकनाट्य, संध्या माने, दत्ता महाडिक आदी प्रसिद्ध फड मालकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी आपल्या यात्रोत्सवाची सुपारी ठरवण्यासाठी येत आहेत. तालुक्यातील मुख्य गावे शिरोली बुद्रुक व येणेरे येथील ग्रामस्थांनी आपल्या गावच्या यात्रेची सुपारी ठरवली आहे.

पुणे जिल्ह्यात यात्रोत्सवात तमाशा सादर करण्याची परवानगी जरी शासनाने दिली असली, तरी काही जिल्ह्यांमधून अशी परवानगी नाही. याचा परिणाम तमाशा सुपारी (बुकिंग) वर झाला आहे. त्यामुळे शासनाने तमाशा कलावंतांच्या पोटा पाण्याचा प्रश्न विचारत घेता याबाबत योग्य धोरण अवलंबिणे गरजेचे आहे.
– रघुवीर खेडकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा तमाशा परिषद

जागरण-गोंधळाला तमाशाचे स्वरुप आल्याचे मत

सध्या पारंपरिक व धार्मिक जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमाला तमाशाचे स्वरूप आले आहे. या कार्यक्रमात धार्मिक विषय सोडून तमाशाप्रमाणे कार्यक्रम करण्यात येऊ लागल्याने व या कार्यक्रमातील कलावंतांना दोन ते तीन हजार रुपये एका कार्यक्रमाचे मिळू लागल्याने याचा परिणाम देखील तमाशाच्या बुकिंगवर झाल्याचे अविष्कार मुळे, मुसाभाई इनामदार, मोहित नारायणगावकर, किरण ढवळपुरीकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button