पुणे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा बदली पॅटर्न प्रभावी | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा बदली पॅटर्न प्रभावी

पुणेः अशोक मोराळे : प्रत्येक वर्षी पोलिस दलातील अंतर्गत बदली प्रक्रिया हा महत्वाचा विषय असतो. विशिष्ट कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिसांच्या नियमित बदल्या केल्या जातात. तर काही पोलिसांच्या बदल्या विनंतीवरून केल्या जातात. एवढेच नाही तर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून आपल्या मर्जीतील कर्मचार्‍यांसाठी खास सेटींग सुद्धा लावली जाते. मात्र यंदाच्या बदली प्रक्रियेत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिकाधिक पारदर्शक प्रक्रिया राबवित बदल्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रेटींगच्या पोस्टींगसाठी सेटींग करणार्‍यांना चांगलाच दणका बसला आहे. यामुळे अमिताभ गुप्ता यांचा बदली पॅटर्न प्रभावी मानला जातोय

गुप्ता यांनी शहर पोलिस दलातील अंदर्गत बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुसूत्रता यावी म्हणून ’जनरल ट्रान्सफर पोलिस मॅनेजमेंट सिस्टम’ नावाची प्रणाली ( ऍप) विकसित केली होती. त्यानुसार चालू वर्षातील बदल्या याच अ‍ॅपच्या माध्यमातून केल्या जात आहेत. बदलीच्यावेळी संबंधित कर्मचार्‍याची कुंडलीच एका प्रकारे समोरील संगणकावर दिसते.

शहर पोलिस दलात असे ही काही कर्मचारी आहेत की, ज्यांनी कित्येक दिवसापासून त्याच-त्या ठिकाणी आपले बस्तान बसवले आहे.

अनेकदा बदली झाल्यानंतर देखील वरिष्ठांची मर्जी संपादन करून परत प्रतिनियुक्तीवर त्याच ठिकाणी काम करतात.

तसेच एखाद्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची बदली झाल्यानंतर ते अधिकारी आपल्या मर्जिवान कर्मचार्‍याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.

तर काही अधिकार्‍यांचा हा कर्मचारी आपल्याकडेच हवा असा देखील अट्टाहास ठेवतात.

महत्वाच्या पोलिस ठाण्याबरोबरच वाहतूक आणि गुन्हे शाखेला पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र यंदा पोलिस आयुक्तांनी तयार केलेल्या अ‍ॅप प्रणाली बदली पात्र झालेल्या प्रत्येक कर्मचार्‍याची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामध्ये सहायक फौजदारापासून ते पोलिस अंमलदाराने यापुर्वी कोण-कोणत्या ठिकाणी काम केले. तेथील त्यांच्या कामाचे रेकॉर्ड कसे आहे. त्यांच्याकडून कोणत्या विभागाची मागणी केली आहे. याचा बदलीसाठी नेमण्यात आलेल्या समीतीकडून विचार केला जातो. त्यानंतर कर्मचार्‍याची सोय आणि त्याचे कामाचे योग्य मुल्यमापन करून त्याची बदली केली जाते.

गुन्हे शाखेतील नियुक्तीसाठी मुलाखती

शहर पोलिस दलात प्रथमच गुन्हे शाखेत काम करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या कर्मचार्‍यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. गुन्हे शाखेत काम करण्यासाठी नेहमीच कर्मचार्‍यांचा ओढा असतो. त्यामुळे अनेकांकडून गुन्हे शाखेला प्राधान्य दिले जाते. परंतू कधी-कधी असे देखील होते की कामाचा अनुभव नसणारे देखील तेथे दाखल होतात. त्याचा परिणाम निश्चितच त्या युनिटच्या कामकाजावर होतो. तर काही जण विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून येतात. त्यामुळे मुलाखतीद्वारे एक प्रकारे कर्मचार्‍यांच्या कामकाजाची चाचणीच घेण्यात आली आहे.

चुकीला माफी नाहीच….

पोलिस आयुक्त गुप्ता हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून नेहमी उल्लेखनिय काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कौतूकाची थाप, तर कर्तव्यात कसूर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो. कर्तव्यात कसूर केलेल्यांची रवानगी त्यांनी थेट मुख्यालयात केली आहे. असे अनेक कर्मचारी परत मुख्यालयातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे रेकॉर्ड पाहता आयुक्तांनी त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवत एका प्रकारे चुकीला माफी नाहीच असे म्हटले आहे.

या गोष्टींचा बदल्यांच्यावेळी विचार

बदलीसाठी पात्र असलेल्या व विनंती केलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना महिला कर्मचारी व त्यांच्या लहान मुलांचे संगोपण, सेवानिवृत्तीच्या वाटेवर व आजारी असलेले कर्मचारी, वास्तव्यास असलेले ठिकाण आणि त्यांनी दिलेलेल्या पर्यायातील जवळचे ठिकाण. यापुर्वी काम केलेले ठिकाण, तसेच ज्या पोलिस कर्मचार्‍यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करता वाहतूक शाखेत त्यांची बदली नाही. हे मुद्दे कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांच्यावेळी विचारात घेतले जात असल्याचे समजते.

हे ही पाहा :

Back to top button