कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली; महापुराची भीती | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली; महापुराची भीती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदी ने धोका पातळी ओलांडली असून कोल्हापूरला महापुराची भीती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने 24 तासांत 202 मिलिमीटर पाऊस कोसळला. राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी रात्री 11.30 वाजता 43 फुटांवर गेल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

महापुराच्या भीतीने जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील 996 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्या सायंकाळी 6 पर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या.

111 बंधारे पाण्याखाली गेले असून, 8 प्रमुख व 28 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. संततधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रात्री उशिरा बावडा-शिये रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

वेधशाळेने 22 व 23 रोजी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. गुरुवारी दुपारी पुण्याहून ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या. यातील एक तुकडी शिरोळला, तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात रवाना करण्यात आली आहे. पाऊस असाच कोसळत राहिल्यास शुक्रवारी कोल्हापूरला महापुराची भीती आहे.

पंचगंगा नदीचे पाणी जामदार क्लबजवळ आले असून, कुंभार गल्ली, मंगळवार पेठेतील रेणुका मंदिर, न्यू पॅलेस, रामानंदनगर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात पाणी आल्यामुळे कोल्हापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, राधानगरी धरणातून 1,425 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे-मळीचा धनगरवाडा येथे भूस्खलन झाले. त्यात बाबू म्हाकू कोकरे यांचे घर कोसळले असून, निम्मे घर मातीमध्ये गाडले आहे, त्यात 2 जनावरे दगावली असून, घरातील सर्व व्यक्ती सुरक्षित आहेत. उत्तूरजवळ (ता. आजरा) एका पोल्ट्री फार्ममध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने सुमारे 4 हजार कोंबड्या वाहून गेल्या आहेत.

जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या तालुक्यांत गुरुवारी दिवसभर सरासरी सुमारे200मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांमध्ये 80 ते 125 मि.मी. पाऊस झाला आहे.

राधानगरी धरणातून 1,425 क्युसेक्स विसर्ग

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सकाळी सहापासून सायंकाळपर्यंत अवघ्या आठ तासांत 212 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. धरण 75 टक्के भरले असून, 1,425 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. अलमट्टी धरणातून सध्या 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणातून एकूण 780 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. घटप्रभा धरणाच्या सांडव्यावरून 14 हजार 719 क्युसेक्स, पॉवर हाऊसमधून 900 क्युसेक्स असा एकूण 15 हजार 619 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग घटप्रभा नदीत सुरू आहे. पाटगाव धरणातून 220 क्युसेक्स पाणी वेदगंगा नदीत सोडण्यात येत आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली असून, धरणाच्या वक्री दरवाजातून रात्री आठ वाजता 22 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

शिरोळ तालुक्यात43 गावांना धास्ती

धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा तालुक्यातील 43 गावे महापुराच्या छायेखाली आहेत. ‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून पूरग्रस्त गावांतील लोकांना सावध करण्याचे काम गुरुवारी सायंकाळपासून सुरू झाले आहे.

राजापूर बंधार्‍यातून 58 हजार क्युसेक्स विसर्ग

कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फूट झाली आहे. दोन्ही नद्यांतून राजापूर बंधार्‍यातून कर्नाटक राज्यात 58 हजार 70 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिरोळ बंधार्‍यावर 40 फूट पाणी पातळी झाली आहे. बंधार्‍यावरून 9 फुटांनी पाणी वाहत आहे. नृसिंहवाडी संगमाजवळ 40 फूट 9 इंच इतके पाणी आहे. तर, राजापूर बंधार्‍यात 25 फूट 9 इंच इतकी पाणी पातळी, तर बंधार्‍यावरून 9 फुटांनी पाणी वाहत आहे.

राधानगरी तालुक्यातअनेक ठिकाणी रस्ते बंद

राधानगरी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. कोल्हापूरहून कोकणकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला असून, फोंडा, कणकवलीकडे जाणारी वाहने, एस.टी. बसेस सुरक्षित ठिकाणी थांबल्या आहेत. पावसाची संततधार सुरूच आहे.

भुदरगडमध्ये 10 बंधारे पाण्याखाली

भुदरगड तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरू असून, पावसाने तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. गारगोटी-कोल्हापूर, पिंपळगाव, शेळोली मार्गावर ठिकठिकाणी पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे. तर गारगोटी शहरात रस्त्यावरील काही घरांत पाणी शिरले. वेदगंगा नदीला महापूर आला असून, वेदगंगा नदीवरील सुक्याचीवाडी, दासेवाडी, ममदापूर, करडवाडी, शेळोली, शेणगाव, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर हे दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पाटगाव जलाशयात183 मि.मी. पावसाची नोंद

पाटगाव मौनीसागर जलाशयात 183 मि.मी. इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली असून, जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जलाशयात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोंडोशी, वासनोली लघू प्रकल्प भरले असून, फये, मेघोली भरण्याच्या मार्गावर आहेत.

गगनबावड्यात धरण क्षेत्रात विक्रमी पाउस

गेल्या पाच दिवसांपासून गगनबावडा तालुक्याला मुसळधार पाऊस व वादळी वार्‍याने झोडपून काढले आहे. गेेल्या चोवीस तासांत सकाळी आठपर्यंत गगनबावडा तालुक्यात 274 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात कुंभी धरण क्षेत्रात 304 मिलिमीटर, तर कोदे धरण क्षेत्रात 252 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात 1 जून पासून 3435 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हिरण्यकेशीवरील सर्व बंधारे पाण्याखाली

गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून, गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर तसेच महागाव येथील ओढ्यावर पाणी आल्याने या ठिकाणचा संपर्क तुटला होता. कोकणपट्ट्यात सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत बुधवारी रात्रीपासून वेगाने वाढ झाली. सकाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे काही वेळातच बंधारे पाण्याखाली जाणार याची जाणीव झाल्याने प्रशासनाने या ठिकाणी यंत्रणा लावली.

कालकुंद्री-कुदनूर रस्ता वाहून गेला

सलग तिसर्‍या दिवशी चंदगडला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. घटप्रभा नदीवरील पिळणी बंधार्‍यावर पाणी आल्याने तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. अविरत कोसळणार्‍या पावसाने अनेक घरांची पडझड झाली, तर झाडे उन्मळून पडून वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही गावे अंधारात बुडाली. दोनच महिन्यांपूर्वी केलेला कालकुंद्री-कुदनूर रस्ता वाहून गेला.

आजर्‍याचा आठ गावांशी संपर्क तुटला

आजरा तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिरण्यकेशी व चित्री नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पावसाचा जोर जास्त असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, चांदेवाडी, दाभिल, देवर्डे, किटवडे, शेळप, हाजगोळीसह सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने या गावांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत. पश्चिम भागातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

हातकणंगलेत वारणा, पंचगंगा पात्राबाहेर

हातकणंगले तालुक्यामध्ये सलग दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा, पंचगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. संततधार पावसाने वारणा व पंचगंगा नदीकाठच्या पिकांना जलसमाधी मिळाली आहे. तालुक्यातील भाजीपाला केलेल्या गावांतील शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला असून, शेतकर्‍यांचा लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

शाहूवाडीत 453 जणांना सुरक्षितस्थळी हलवले

शाहूवाडी तालुक्यात कडवी, शाळी, कासारी, कानसा आदी नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण व जंगलव्याप्त क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज 175 मि.मी. पर्जन्यवृष्टी झाली आहे. गतवेळी पुराची झळ पोहोचलेल्या व नदीकाठच्या 25 गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आठ गावांमध्ये पूर व अतिवृष्टीने 121 कुटुंबांतील 453 नागरिकांना तसेच मोठी जनावरे 72 व लहान 50 असे एकूण 122 पशुधन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. आंबा, विशाळगड परिसरात ढगफुटीसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आंबा -विशाळगड घाट, पांढरेपाणी – पावनखिंड मार्गावर झाडे कोलमडून पडली आहेत.

कागल : अनेक बंधारे पाण्याखाली

तालुक्यात एकाच दिवशी 93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तमनाकवाडा येथील तीन घरे, केनवडे येथील दोन आणि पिंपळगाव येथील एक घर मुसळधार पावसाने पडून मोठे नुकसान झाले आहे. चिकोत्रा नदीवरील बेलेवाडी काळम्मा, हसूर खुर्द बंधार्‍यांवर पाणी आले आहे. कापशी येथील दलित वस्तीमधील घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे लोकांचे हाल होत आहे.

तुळशी खोर्‍यातील 25 गावांचा संपर्क तुटला

करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील कोल्हापूर पद्धतीचे दहाही बंधारे पाण्याखाली गेले असून, तालुक्याच्या पश्चिम भागात तुळशी खोर्‍यातील 25 गावांसह वाड्या-वस्त्यांचा शहराशी असणारा थेट संपर्क तुटला आहे. हळदीत दोन ठिकाणी पाणी आले असून, तुळशी खोर्‍यातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्याच्या धरणांतील पाणीसाठा असा…

तुळशी 67.21 द.ल.घ.मी. (68 टक्के), वारणा 838.32 द.ल.घ.मी.(86 टक्के), दूधगंगा 430.43 द.ल.घ.मी. (60 टक्के), कासारी 61.71 द.ल.घ.मी. (79 टक्के), कडवी 59.59 द.ल.घ.मी. (84 टक्के), कुंभी 63.95 द.ल.घ.मी. (83 टक्के), पाटगाव 81.42 द.ल.घ.मी. (77 टक्के).

ओढ्यातून एक वाहून गेला; दोघांना वाचविण्यात यश

चंदगड तालुक्यात घुल्लेवाडीमार्गे तळगोळीकडे जाताना घुल्लेवाडी व निट्टूरदरम्यानचा ओढा ओलांडताना तिघेजण वाहून गेले. यामध्ये तळगोळीच्या सुनीता पांडुरंग कंग्राळकर (वय 38) यांचा शोध लागला नाही. तर सौरभ पांडुरंग कंग्राळकर व यलुबाई तुकाराम कंग्राळकर यांना वाचविण्यात यश आले.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 पर्यंत पडलेला तालुकानिहाय पाऊस असा : आजरा 76.06, भुदरगड 71.85, चंदगड 66.13, गडहिंग्लज 45.18, गगनबावडा 50.5, हातकणंगले 14.81, कागल 60.79, करवीर 62.16, पन्हाळा 49.93, राधानगरी 101.58, शाहूवाडी 93.42, शिरोळ 4.14.

या मार्गांवरील वाहतूक बंद

  • कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी; वाहतूक पूर्णत: बंद
  • कसबा बावडा-शिये रस्ता बंद
  • मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी
  • बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला
  • मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद
  • उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी
  • कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद
  • करंजफेण, माळापुडे, पेंढाखळे वाहतूक थांबवली
  • करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद
  • निलजी, ऐनापूर बंधार्‍यावर पाणी; वाहतूक बंद
  • मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी
  • गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद
  • कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली
  • गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद
  • मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,
  • निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू
  • सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली
  • सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू
  • बस्तवडे ते आणूर बंधार्‍यावर पाणी
  • पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू
  • कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्‍यांवर पाणी
  • महे ते बीड मार्गावर पाणी; वाहतूक बंद

Back to top button