

पांडुरंग सांडभोर
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह अन्य पक्षांतील नगरसेवकांना पक्षात घेण्यास खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्तास 'ब्रेक' लावला आहे. आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट होईपर्यंत 'वेट अँड वॉचची' भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत जाऊ इच्छित असणार्यांना प्रतीक्षा रांगेत उभे राहावे लागणार आहे.
महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भाजपमधील 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केले आहे. मात्र, आता प्रभागरचना जाहीर होऊन तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत व माजी नगरसेविका जयश्री मारणे यांचा अपवाद वगळता एकाही नगरसेवकाचा प्रवेश अद्याप राष्ट्रवादीत झालेला नाही. मात्र, या पक्ष प्रवेशांना खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांनीच लगाम लावला असल्याचे आता समोर आले आहे.
जोपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होत नाही आणि प्रभागातील चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणालाही पक्षात घ्यायचे नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले. आताच बाहेरील पक्षातील नगरसेवक आणि अन्य इच्छुकांना पक्षात घेतले आणि जर आरक्षण सोडतीत संबंधिताला उमेदवारी देता आली नाही तर चुकीचा मेसेज जाऊ शकतो अथवा किंवा त्यामुळे पक्षातीलच इच्छुक कार्यकत्र्यांवरही अन्याय होऊ शकतो, त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ज्या प्रभागात सक्षम उमेदवार नाही, अशाच ठिकाणी बाहेरील पक्षातील उमेदवार घेण्याची भूमिका पवार यांनी घेतली असल्याचे समजते. त्यामुळे किमान आरक्षण सोडत जाहीर होईपर्यंत तरी अपवाद वगळता मोठे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
दिलेला शब्द पाळणारा नेता अशीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ख्याती आहे. त्यामुळे बाहेरील पक्षातील नगरसेवक अथवा इच्छुकांना पक्षात घेतले आणि आरक्षण सोडतीनंतर संबंधित प्रभागात त्याला उमेदवारी देता आली नाही तर चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळेच पक्ष प्रवेशांना तूर्तास ब्रेक लावला आहे.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.