पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर्षी 170 शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत.
मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील आरटीई प्रवेशासाठी 182 शाळांची नोंदणी करण्यात आली होती. तर, या शाळेत 3664 जागा उपलब्ध होत्या.
यंदा बर्याच शाळांनी अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र मिळविले असल्याने शाळा नोंदणीचा आकडा कमी झाला आहे.
नऊ शाळा अल्पसंख्यांक व तीन शाळा बंद अल्पसंख्यांक शाळांना आरटीईनुसार 25 टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही.
त्यामुळे शहरामध्ये अल्पसंख्यांक शाळांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन शासनाने अल्संख्यांक शाळांनाही या ऑनलाईन भरती प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच, यावर्षी शहरातील तीन शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे बारा शाळांची नोंदणी कमी झाली आहे.
शहरातील अनेक शाळा केवळ भाषिक अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळवत आहेत. परंतु, अल्पसंख्यांकांसाठीचे कोणतेही नियम ते पाळत नसल्याचे दिसत आहे.
या शाळांना आरटीईनुसार 25 टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही. यंदाही शहरातील 9 शाळांनी अल्पसंख्यांक दर्जा मिळविल्यामुळे आरटीईसाठी शाळांची नोंदणी कमी होताना दिसत आहे.
दरवर्षी शाळांनी अल्पसंख्यांकचा दर्जा मिळवून आरटीईतून पळवाट काढली तर नोंदणी करणार्या शाळांचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. धनदांडगेदेखील शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा घेेवू लागले तर सर्वसामान्य शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती पालकांमध्ये आहे.
आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी 16 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार होती. मात्र, अद्याप शाळा नोंदणी सुरू असल्याने नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली कि नाही याबाबत कोणतीही सूचना दिली नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
दोन दिवसांपासून पालक प्रवेश अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रांवर जात आहेत. 16 फेब्रुवारीपासून पालकांना अर्ज भरता येणार असल्याचा उल्लेख वेबसाइटवर आहे. प्रत्यक्षात संकेतस्थळ अद्यावत नसल्याचे पालकांनी सांगितले.