आता मोबाईलवर कळणार हृदयाचे ठोके; ‘रिअल टाईम’ माहिती थेट मोबाईलवर | पुढारी

आता मोबाईलवर कळणार हृदयाचे ठोके; ‘रिअल टाईम’ माहिती थेट मोबाईलवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने 45 वर्षीय महिलेच्या हृदयात चक्क ब्ल्यूटूथ असलेला पेसमेकर बसवला आहे. यामुळे या रुग्णाच्या हृदयाचे ठोके, त्याची कार्यपद्धती याबाबत ‘रिअल टाईम’ माहिती थेट रुग्णाच्या मोबाईलवर मिळेल व त्यानुसार हृदयाच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवता येईल. या यंत्रामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये त्याचा अहवाल दाखविण्यासाठी वारंवार येण्याची गरज भासणार नाही.

या महिलेच्या हृदयाचे कार्य केवळ 25 टक्के क्षमतेने चालत होते. तिला थोडे अंतरदेखील चालणे शक्य नव्हते. चालल्यावर लगेचच दम लागायचा. हृदयाच्या कमकुवत झालेल्या स्नायूंमुळे ही स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत हृदयप्रत्यारोपणच्या आधीचा पर्याय म्हणून पेसमेकरची निवड डॉक्टरांनी केली आणि तो बसवला. आता या महिलेची स्थिती सुधारली असून, हृदयाचे कार्य 10 ते 15 टक्के सुधारले आहे, अशी माहिती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित पळशीकर यांनी दिली.

Shaktimaan Teaser : शक्तीमान मोठ्या पडद्यावर, येतेय तीन चित्रपटांची सीरीज

जेव्हा हृदयाचे ठोके मंद गतीने पडतात तेव्हा हृदयात पेसमेकर बसवला जातो. त्यामुळे अचूकपणे कालबद्ध विद्युतकंपने निर्माण करून तो हृदयाला उत्तेजना देतो व हृदयाचे कार्य योग्यरीत्या हाताळतो. याआधी ब्ल्यूटूथ नसल्याने पेसमेकरवर अ‍ॅनलायझर ठेवून अहवाल काढला जायचा आणि तो डॉक्टरांना दाखविला जायचा. मात्र, आता यासाठी रुग्णाला प्रत्येक वेळेस रुग्णालयात यायची गरज नाही. रुग्णालयापासून दूरवर असलेल्या रुग्णांसाठी ही मोठी सोय ठरू शकते.

कसे काम करते हे पेसमेकर?

हे उपकरण हृदयाच्या जवळ रोपित केले जाते व त्याला हृदयाचे विविध कप्पे तीन वायरने जोडले जातात. हृदयात काही अनियमितता झाली तर लहान प्रमाणात विद्युतप्रवाह उत्सर्जित केला जातो. थोडक्यात ‘कार्डियाक रि-सिंक्रोनायझेशन थेरपी’ द्वारे हृदयाच्या विविध कप्प्यांनी एकसंध काम करावे यासाठी प्रयत्न केला जातो.

Ladies Police : पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी!

ब्ल्यूटूथमुळे फोनवर मिळणार अपडेट

सर्वसामान्यपणे पेसमेकरला ब्ल्यूटूथ नसते. मात्र, या रुग्णाच्या पेसमेकरला ब्ल्यूटूथ वैशिष्ट्य असल्यामुळे याला थेट रुग्णाच्या मोबाईल फोनवरील अ‍ॅप जोडले जाऊ शकते. या अ‍ॅपमुळे हृदयाच्या ठोक्यांवर निरीक्षण केले जाऊ शकते आणि ब्ल्यूटूथने जोडलेल्या या उपकरणामुळे हृदयाच्या ठोक्यांची लय आणि कार्यामध्ये कोणतेही बदल झाले तर ते डॉक्टरांना सांगता येईल. त्यानुसार डॉक्टर दूरवरून उपचार सूचवू शकतात.

Back to top button