पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पतीच्या कारमध्ये पत्नीने गुपचूप जीपीएस ट्रॅकर बसवले. त्यानंतर पतीचा माग काढून त्याला एका हॉटेलमध्ये महिलेसोबत रंगेहाथ पकडले. हा प्रकार 21 ऑक्टोबर 2020 रोजी बावधन येथील व्हिवा इन या हॉटेलमध्ये उघडकीस आला.
अरिफ अब्दुल मांजरा (41, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत) यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अरिफ याच्या पत्नीने याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आणि आरोपी अरिफ यांचा सन 2005 मध्ये सुरत येथे विवाह झाला.
लग्नानंतर पती अरिफ कामानिमित्त बेंगलोर येथे जात होते. दरम्यान, त्यांचे वागणे फिर्यादी यांना संशयास्पद वाटू लागले. त्यामुळे त्यांनी 21 ऑक्टोबर 2020 रोजी अरिफच्या यांच्या कारमध्ये जीपीएस डिव्हाईस बसवले.
या डिव्हाईसमुळे अरिफ याचे लोकेशन बावधन येथील हॉटेल व्हिवा असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यामुळे फिर्यादी यांनी इंटरनेटवरून हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवला. हॉटेलच्या क्रमांकावर फोन करून अरिफ हॉटेलमध्ये आले आहेत का, अशी चौकशी त्यांनी केली.
त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याचे हॉटेलमधून सांगण्यात आले. त्यावर मीच त्यांची पत्नी असल्याचे फिर्यादी यांनी हॉटेल चालकाला सांगितले.
हॉटेलमधून मिळालेल्या माहितीमुळे फिर्यादी यांचा संशय आणखीनच बळावला. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन माहिती घेत तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यावेळी आरोपी अरिफ याच्यासोबत एक महिला त्यांचे आधारकार्ड वापरून राहिल्याचे समोर आले. फिर्यादी यांनी अधिक माहिती घेतली असता संबंधित महिलेसोबर आरोपीचे संबंध असल्याचे उघड झाले. त्यानुसार, त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.