

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने कागदपत्रांची तपासणी करून याबाबत शिफारस केली. पुणे जिल्ह्यातील अशी बरीच प्रकरणे ससूनमध्ये येतात. गेल्या सहा वर्षांतील 112 प्रकरणे ससूनकडे प्रलंबित आहेत.
खासगी अथवा शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, रुग्णाला येणारे अपंगत्व अशा घटना घडल्यास चौकशी समिती नेमली जाते. रुग्णालयांवर कारवाई करण्याआधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाते. (Latest Pune News)
त्यानंतर त्याबाबतचा अहवाल पोलिसांना सादर केला जातो. पुणे जिल्ह्यातील अशा अनेक प्रकरणांचा अहवाल ससूनमध्ये तयार केला जातो. सातारा, सांगली, अहमदनगर अशा काही जिल्ह्यांतील प्रकरणेही ससूनमध्ये वर्ग करण्यात आली आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक, प्रकरणाशी संबंधित विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालय प्रतिनिधी, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख अशा चार- पाच सदस्यांचा समावेश असतो. ससूनमधील सदस्यांनी आतापर्यंत प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अपूर्ण असलेल्या कागदपत्रांबाबत रुग्णालयांशी, पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.
अनेक प्रकरणांमध्ये अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याने प्रकरणे प्रलंबित असल्याचे ससून प्रशासनातर्फे सांगण्यात आले. उपलब्ध डॉक्टरांवरील कामाचा ताण, मनुष्यबळाचा अभाव अशा कारणांमुळे समितीचे सर्व सदस्य एकाच वेळी उपस्थित राहू न शकल्यानेही प्रकरणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
इतर जिल्ह्यांचा ताणही ससूनवरच
वैद्यकीय निष्काळजीपणाची प्रकरणे संबंधित जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने हाताळणे अपेक्षित आहे. एखाद्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यास तेथील जिल्हा रुग्णालयाकडे प्रकरण वर्ग केले जाऊ शकते. मात्र, सातारा, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यांमधील काही प्रकरणेही अहवालाच्या शिफारसीकडे ससूनकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे ससूनमधील समितीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
वैद्यकीय निष्काळजीपणाची 200 हून अधिक प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत समितीने एकत्र येऊन बैठका घेऊन काही प्रकरणे निकाली लावली आहेत. इतर जिल्ह्यांतील प्रकरणे तेथील वैद्यकीय महाविद्यालयांकडे वर्ग करावीत, अशी मागणी केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील काही प्रकरणांमधील कागदपत्रे अपुरी असल्याने त्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. रुग्णांना आणि नातेवाईकांना न्याय मिळावा, यासाठी गतिमान कार्यवाही केली जाणार आहे.
- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय