पुणे : नवले पुलावर वाहतूक पोलिसांची दादागिरी; दंड वसुलीने वाहनचालक त्रस्त | पुढारी

पुणे : नवले पुलावर वाहतूक पोलिसांची दादागिरी; दंड वसुलीने वाहनचालक त्रस्त

प्रसाद जगताप, पुणे

नवले पूल शहरापासून बाजूला असल्यामुळे येथील वाहतूक पोलिसांची दादागिरी भलतीच वाढल्याचे दिसत आहे. चक्क वाहने रस्त्यातच अडवून खाबुगिरी करणारे वाहतूक पोलिस दंड वसुली करत आहेत. त्यामुळे येथील परिसरात मोठी वाहतूक कोंडी वाढत आहे.
नवले पूल परिसरात दर महिना-दोन महिन्यांनी मोठे अपघात होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी फक्त वाहतूकीचे नियोजन करणे, गरजेचे आहे.

मात्र, येथील भागातील वाहतूक पोलिस वाहतूक नियोजनाचे आपले काम विसरून फक्त दंड वसुलीच करताना दिसत आहेत. यासंदर्भात दै.‘पुढारी’ला याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर येथील परिसरात शनिवारी पहाणी करण्यात आली. यावेळी येथील पोलिसांची दादागिरीच पाहायला मिळाली.

एखाद्या वाहनचालकावर कारवाई करायची असेल. तर त्याला रस्त्यावरून बाजूला घेऊन चौकशी करणे अपेक्षित आहे. मात्र, शनिवारी नवले पूल परिसरातील वाहतूक पोलिसांनी चक्क रस्त्यावरच वाहने थांबवून दादागिरी करायला सुरूवात केली. त्यामुळे येथे आधीच रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीत भर पडली. हा प्रकार नवले पूल परिसरात शनिवारी घडला.

नवले पूलाजवळ ड्युटीवर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी कात्रजच्या दिशेने नवले पूलाजवळ आलेली चारचाकी गाड्या रस्त्यातच अडवायला सुरूवात केली अन तेही भर रस्त्यातच. यापुर्वी तर येथे मोठे वाळूचे ट्रक रस्त्यातच अडविण्यात आले होते.

त्याचबरोबर नवले ब्रीजकडून कात्रजच्या दिशेने जाताना रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध पोलीसांच्यावतीने वारंवार कारवाई केली जाते. सध्या या ठिकाणी रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे रस्ता अरूंद बनला आहे. त्यातच पोलीसांनी कारवाईसाठी वाहने अडवल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फक्त दंड वसुलीकडे लक्ष देण्यापेक्षा वाहतूक नियोजनही करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा

Back to top button