पुणे; पुढारी वृत्तसेवा : गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत महापालिकेकडून 371, तर खासगी रुग्णालयांकडून 27 असे 398 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 118 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 11 जणांमध्ये गोवरचे निदान झाले आहे. अद्याप 269 अहवाल प्रलंबित आहेत.
शहरात गोवरच्या एका उद्रेकानंतर आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. पथकांतर्फे 4556 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 1 ते 5 वर्षे वयोगटातील 1751 बालकांची तपासणी करण्यात आली असून, 1019 बालकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित 732 बालकांचे लसीकरण पुढील 4 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
गोवरचे रुग्ण आढळून आल्याने परिसरातील सर्व घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गोवर रुबेला लसीकरणासाठी पोस्टर आणि बॅनर लावून जनजागृती करण्यात येत आहे. भवानी पेठेमधील धार्मिक स्थळामध्येही जनजागृती केली जात आहे. आरोग्य सेवकांची नियमितपणे बैठक घेण्यात येत आहे. कचरावेचक घंटागाडीद्वारेही लसीकरण मोहीम आणि गोवरविषयी माहिती दिली जात आहे.
लसीकरण मोहीम (16 डिसेंबर)
विशेष लसीकरण सत्रे – 44
पहिला डोस दिलेले लाभार्थी – 138
दुसरा डोस दिलेले लाभार्थी – 170
'अ' जीवनसत्त्व दिलेले लाभार्थी – 497
उद्रेकग्रस्त भागात अतिरिक्त लसीकरण – 182