पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या निकालात राज्यात गेल्यावर्षी 151 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले, तर 66 हजार 578 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. यंदा 187 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत, तर 81 हजार 991 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी चार लाख 89 हजार 455 होती, तर यंदा पाच लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात शतप्रतिशतसह गुणवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर यावेळी उपस्थित होते. राज्यातील 23 हजार 288 शाळांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 94.56 टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत 2.65 टक्के मुलींचा निकाल जास्त लागला आहे. राज्य मंडळाने यंदा 1 ते 26 मार्चदरम्यान दहावीची लेखी परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतली. राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दहावीचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा निकाल यंदा 95.81 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.01 टक्के, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 94.73 टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा निकाल यंदा 96.44 टक्के आहे.
नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 64 हजार 885 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कोकण विभागाखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि शेवटी नागपूर विभागाने बाजी मारली आहे. एकूण 18 विषयांचा, तसेच नऊ हजार 382 शाळांचा निकाल 100 टक्के लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
इयत्ता दहावीच्या पुणे विभागाचा निकाल 96.44 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात राज्यातील नऊ विभागांमध्ये पुणे विभाग तिसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 95.83 टक्के लागला आहे. सोलापूर जिल्हा दुसर्या, तर अहमदनगर जिल्हा तिसर्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा