

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राजन राजमणी आणि त्याच्या साथीदाराला पकडल्याचे समजल्यावर माजी नगरसेवक विवेक यादव याने शहरातून पळ काढला आहे. कोंढवा पोलीसांची पथके त्याचा शोध घेत असून अद्याप तो सापडलेला नाही.
पूर्ववैमनस्यातून बबलू गवळीचा काटा काढण्यासाठी शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला सुपारी देणारा यादव हा देखील पोलिस रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर लष्कर, खडकी, वानवडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत विवेक यादव याच्यावर बबलु गवळी याने गोळीबार केला होता. या गोळीबारातून यादव थोडक्यात बचावला होता.
याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गवळी टोळीच्या १३ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे गवळीविरुद्ध यादव याला कायम राग होता. त्याचा काटा काढण्यासाठी त्याने सुपारी दिली व शस्त्रेही पुरिवली होती.
सुदैवाने त्याची खबर पोलिसांना लागली त्यानंतर पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. परिमंडळ २ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी यादव याला ४ ऑक्टोंबर २०१४ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते.
त्यावेळी यादव याने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळविली होती. त्यानंतर तो पुणे कँटोंमेंटच्या बोर्डाच्या निवडणुकीत निवडून आला होता.