Indapur : डाळिंब उत्पादक शेतकरी झाले कर्जबाजारी | पुढारी

Indapur : डाळिंब उत्पादक शेतकरी झाले कर्जबाजारी

शेळगाव, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर (Indapur) तालुक्यात मागील २० ते २५ वर्षांचा काळ आठवला, तर डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला समाजात मोठे स्थान होते. तसेच डाळिंब बागायतदार म्हणून नातेवाईकांच्यात मोठा रुबाब होता. रातोरात शेतकऱ्यांना मालामाल करून श्रीमंत करणारी डाळिंबशेती मात्र मागील चार-पाच वर्षांपासून तेल्या, मर, कुज यासह अन्य रोगांमुळे मोठ्या संकटात सापडली आहे.

सध्या रातोरात गरीब व कर्जबाजारी करणारी शेती म्हणजे डाळिंबशेती अशी अवस्था इंदापूर (Indapur) तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. डाळिंबशेती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात निर्माण झाले आहे. इंदापूर तालुक्यातील प्रामुख्याने शेळगाव, कडबनवाडी, निमगाव केतकी, रामकुंड, व्याहाळी, वरकुटे, काटी, गोतोंडी, कळस, अंथुर्णे, न्हावी, रुईसह अन्य भागांत मागील वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गणेश, भगवा व अरकता जातीच्या डाळिंबशेतीला सुरुवात झाली.

अनेक शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज काढून पाण्याचे योग्य नियोजन करून शेततळी बांधून व नवीन शेती खरेदी करून डाळिंब शेतीला सुरुवात केली. याला दहा वर्षांहून अधिक काळ मोठे यश आले. या कालावधीत डाळिंबशेतीच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून टोलेजंगी कोट्यवधी रुपयांचे शहरी भागाप्रमाणे आलिशान बंगले बांधून गाड्या घेतल्या. या भागातील डाळिंब सुरुवातीला अहमदाबाद, गुजरात, दुबईसह अन्य राज्यांत तसेच परदेशात विक्रीला जाऊ लागले.

त्यावेळी ४०० रुपये प्रतिकिलोला बाजारभाव देखील काही शेतकऱ्यांना चांगला मिळाला. यामुळे मागील १० ते १५ वर्षांत इंदापूर (Indapur) तालुक्यात डाळिंबशेतीत मोठ्या झपाट्याने वाढ झाली. नावलौकिक प्राप्त झाल्याने अनेक राज्यांतील व परदेशांतील शेतकरी, शास्त्रज्ञ व शेतीसंबंधित शिष्टमंडळाने शेळगाव, अंथुर्णे, कळस, रामकुंडसह अन्य भागांतील डाळिंबशेतीला भेटी देऊन पाहणी केली. २०१४ साली झालेल्या गारपीट व त्यानंतर तेल्या, मर व अवकाळी पाऊस व वेळोवेळी बदलणारे हवामान, यामुळे डाळिंबशेतीला मोठी घरघर लागली. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दूषित हवामानामुळे डाळिंबशेती विविध रोगराईला बळी पडू लागली.

यावर मात करीत अनेक शेतकऱ्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून औषधे, खतांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार डाळिंबशेती जोपासली व पिकवली. परंतु, डाळिंब बाजारात जाण्याची वेळी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडू लागला. इंदापूर तालुक्यातील शेतकरी यामुळे रातोरात डाळिंब बागा काढू लागले असून, डाळिंबशेतीला पर्याय म्हणून कमी खर्चात जास्त उत्पन्न म्हणून पेरू, सीताफळासह इतर पिके घेऊन शेती करू लागले आहेत. काळाने डाळिंबशेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.

शेळगाव (ता. इंदापूर) येथील बीबीएपर्यंत शिक्षण घेतलेला युवा शेतकरी शुभम भारत शिंगाडे यांनी सांगितले की, ” आमच्याकडे ६० एकर डाळिंबशेती होती. मात्र मागील दोन-तीन वर्षांत डाळिंब शेतीवर आलेल्या तेल्या आणि मर रोगामुळे आम्ही २० एकरांतील डाळिंब काढून टाकले आहे. पेरूची शेती करायला सुरुवात केली असून, अजून १० एकरातील डाळिंब काढणार आहे.

कृषी विभागाच्या लेखी एक हजार हेक्टर क्षेत्र कमी

इंदापूर तालुक्यात डाळिंब क्षेत्राची मागील दहा वर्षांतील माहिती विचारणा केली असता, फक्त सन २०१८-१९ मध्ये ९२३२ हेक्टर डाळिंब शेती होती, तर २०२१-२२ मध्ये ८२२२ एवढी डाळिंब शेती आहे. एक हजार हेक्टर क्षेत्र दोन वर्षांत कमी झाले आहे. एवढीच माहिती इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी दिली. यावरून कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तालुक्यात कागदावर डाळिंब क्षेत्र जास्त

इंदापूर तालुक्यात मागील चार-पाच वर्षांत तेल्या, मर रोगांमुळे मोठ्या प्रमाणात डाळिंब क्षेत्र प्रत्यक्षात शेतातून कमी झालेले आहे. मात्र, विविध बँकांच्या कर्जासाठी सातबारावर मात्र पिकपाणी डाळिंबाची असल्यामुळे कागदोपत्री इंदापूर तालुक्यात डाळिंब क्षेत्र जास्त असल्याचे दिसत आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button