हवेली : राष्ट्रवादीला सहा महिन्यांत दोन जबर धक्के | पुढारी

हवेली : राष्ट्रवादीला सहा महिन्यांत दोन जबर धक्के

सीताराम लांडगे, पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असतानाही मागील सहा महिन्यांच्या काळात एका पाठोपाठ दोन जबर राजकीय धक्के पक्षाला बसले आहेत. सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील ‘विशिष्ट कळपा’शी असलेल्या छुप्या युतीमुळे भाजप राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ करण्यात यशस्वी ठरला आहे.

भाजपचे प्रदीप कंद हवेली तालुक्यात आपले स्थान बळकट करण्यात यशस्वी झाले. कंद यांना राष्ट्रवादीच्या तालुक्यातील बड्या नेत्यांनी साथ दिली हे सांगणे नवल नाही. असेच चित्र राहिले तर भविष्यात राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. मागील सहा महिन्यांत दोन निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार असलेल्या ‘पीएमआरडीए’ व सहकारातील जिल्हा बँक या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार सहज निवडून येतील त्यापेक्षा जास्त मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे असतानाही राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक विठ्ठल शितोळे यांचा पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या निवडणुकीत पराभव झाला.

पक्षाने हा पराभव गांभीर्याने घेतला नसल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रदीप कंद हे राष्ट्रवादीला नमोहरम करण्यात यशस्वी ठरले. पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण निवडणुकीत भाजपाचे स्वप्निल उंद्रे हे प्रदीप कंद आणि रोहिदास उंद्रे यांचे उमेदवार होते, तर विठ्ठल शितोळे हे आमदार अशोक पवार यांचे उमेदवार होते.

उंद्रे हे वडगाव शेरी मतदारसंघातले असताना शिरूर-हवेलीतून त्यांना आघाडी मिळाली, तर शितोळे हे याच मतदारसंघातील असतानाही स्थानिक मतदारांनी नाकारले व त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शितोळे यांचा पराभव गांभीर्याने घेतला असता तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षाला नामुष्कीच्या पराभवाला सामोरे जावे लागले नसते.

दोन्ही निवडणुकीच्या निकालावरून असे स्पष्ट होते की, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपाशी छुपी युती आहे. राष्ट्रवादीच्या या गटाचा प्रदीप कंद यांना खुलेआम जाहीर पाठिंबा आहे. पक्षाच्या कोणत्याही नेत्यांची ते तमा बाळगत नाहीत. हेच धोरण भविष्यातील राजकारणात घातक आहे. याची राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रवादीने तालुक्यातील अनेकांना मोठी पदे दिली त्यांनी पक्षासाठी कोणतेही योगदान दिले नाही. उलट विरोधी पक्षाला कायम मदतच केली. कायमच पक्षविरोधी भूमिका घेत पक्षात दुटप्पी राजकारण करणारी एक टोळी सक्रिय आहे. ही टोळी स्वार्थासाठी पक्षाला वापरून घेते. या टोळीचा एक पाय राष्ट्रवादीत तर दुसरा पाय भाजपात असतो. अशा दुटप्पी नेत्यांनाच पक्ष शेंदूर लावतोय. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात हे सहभागी नसतात. अशा नेत्यांना कायमस्वरूपी बाजूला करण्यासाठी आता थेट पक्षप्रमुख शरद पवार यांच्या कानावर या टोळीच्या करामती घालणार आहे.

विकास लवांडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

राष्ट्रवादीची महत्त्वाची पदे घ्यायची आणि भाजपाच्या नेत्यांच्या गळ्यात गळा घालून फिरायचे हे निष्ठावंत कार्यकर्ते सहन करणार नाहीत. दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यात राष्ट्रवादीचे महाभाग कारणीभूत असताना त्यानंतरही पक्षाची पदे मिळविलेले नेते तालुक्यात भाजपाच्या गळ्यात गळा घालून भाजपाच्या व्यासपीठावर जाहीर सत्कार स्वीकारत आहेत, हे कृत्य निषेधार्ह आहे. हवेली तालुक्यातील पक्षाचे अस्तित्व यामुळे धोक्यात येत आहे. अशा महाभागांची तक्रार वरिष्ठांपर्यंत करण्यात येणार आहे.”

अनिल जगताप, प्रसिद्धिप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस.

Back to top button