पुणे : कळस, मुंजाबा वस्तीत तरूणांचा हत्यारांसह दहशत पसरविण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : कळस, मुंजाबा वस्तीत तरूणांचा हत्यारांसह दहशत पसरविण्याचा प्रयत्न

पुणे /येरवडा ; पुढारी वृत्तसेवा : कळसमध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर तरुणांच्या टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या देखील फोडल्या असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून हातामध्ये हत्यारे घेऊन तरूण मागे लागल्याचे दिसत आहेत.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्ती मध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने व टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. त्यामुळे एकंदरीतच विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असल्याने हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे म्हणाले, कोणी गुन्हेगार हातात हत्यारे घेऊन दहशत माजवत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. मुंजाबा वस्ती व कळस येथील दोन्ही प्रकाराबाबत गुन्हे दाखल करण्यास सांगितले असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Back to top button