पुणे : शनिवारी एटीएममध्ये १७ लाखांपेक्षा अधिकचा भरणा अन् आज चोरट्यांनी डल्ला मारला - पुढारी

पुणे : शनिवारी एटीएममध्ये १७ लाखांपेक्षा अधिकचा भरणा अन् आज चोरट्यांनी डल्ला मारला

यवत ; पुढारी वृत्तसेवा

यवत (ता.दौंड जि.पुणे) येथील पुणे- सोलापूर महामार्गा लगत असणाऱ्या व्यापारी गाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी मोठी रक्कम लंपास केली आहे.

आज (सोमवार) पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान यवत येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन रक्कम गॅस कटरच्या साह्याने फोडून त्यातील रक्कम घेऊन चोरट्यानी पोबारा केल्‍याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे तसेच कर्मचारीवर्ग यांनी महाराष्ट्र बँकेच्या एटीएमची पाहणी केली. श्वान पथक देखील यावेळी बोलावण्यात आले होते, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी आढाव यांनी एटीएम मशिनची पाहणी केली व वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला.

शनिवारी भरली होती १७ लाखाची रक्कम…

या चोरीतून नेमकी किती रक्कम गायब झाली आहे याची माहिती मिळू शकली नाही. परंतु शनिवारी सुमारे 17 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त रक्कम या एटीएम मध्ये भरण्यात आली होती आणि तेव्हा पासून हे मशीन बंद अवस्थेत होते अशी माहिती मिळत आहे.

Back to top button