चंद्रावर चे पहिले पाऊल ते खासगी यानाने अंतराळ पर्यटन | पुढारी

चंद्रावर चे पहिले पाऊल ते खासगी यानाने अंतराळ पर्यटन

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रावर मानवाने पहिले पाऊल 20 जुलै रोजी ठेवले त्याला आज तब्बल 52 वर्षे पूर्ण होत आहेत. मानव तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आता थेट अंतराळात खासगी यानाने पर्यटनाची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, प्रख्यात उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गेल्या रविवारी (11 जुलै) अवकाशात झेप घेत खासगी पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली. आता जगातील सर्वात श्रीमंत अ‍ॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस हे खासगी यानाने अंतराळात पर्यटनाला जाणार आहेत. हा प्रवास मानवाने बावन्न वर्षांत केलाय.

अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्थेने तयार केलेल्या अपोलो-11 या यानाने तीन अंतराळवीर 20 जुलै 1969 साली चंद्रावर गेल्याच्या घटनेला 52 वर्षे पूर्ण झाली. आता मानव मंगळ ग्रहावर जाण्याची तयारी करतोय. त्याही पुढे जात तो आता अंतराळात पर्यटनाला जाणार आहे. बावन्न वर्षांपूर्वी जगात फक्त अमेरिकेत टी. व्ही. होता तो ही कृष्णधवल. अंतराळात मानव गेला त्या वेळी यानातील कॅमेरे आजच्या इतके अद्ययावत नव्हते; त्यामुळे चंद्रावरचे शूटिंग शूट करता आले नाही. मात्र, गेल्या 52 वर्षांत तंत्रज्ञानात मानवाने खूपच मोठी प्रगती केल्याने माणूस अंतराळात चक्क खासगी यानाने फिरायला जात आहे.

आज बेजोस जाणार अंतराळ पर्यटनाला

अ‍ॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांनी ही घोषणा करताच 1969 ते 2021 या बावन्न वर्षांतील अपोलो यान मिशनचा प्रवास आता कुठे गेलाय याचा अंदाज येतो. बालपणी त्यांनी अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहिले, मात्र ते अंतराळवीर होऊ शकले नाहीत; पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्यावर त्यांनी खासगी यानाने हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळवली आहे. त्यांची दुसरी कंपनी ब्ल्यू ओरिजीनच्या साहाय्याने न्यू शेपर्ड या कॅप्सुलमधून ते 11 मिनिटांच्या अंतराळ सफरीसाठी जाणार आहेत.

Back to top button