सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादकांना प्रतिटन 103 रुपये व ठेवींवरील व्याज तसेच कामगारांना बोनस व दीड कोटीचा पगारातील फरक दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली. सोमेश्वर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचा व गव्हाणपूजन समारंभ विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय जगताप, जिल्हा बँकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, 'सोमेश्वर'चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, सभापती प्रमोद काकडे, नीता फरांदे, सुदाम इंगळे, 'छत्रपती'चे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांच्यासह संचालक मंडळ या प्रसंगी उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, गेल्या हंगामात 'सोमेश्वर'ने 13 लाख 25 हजार टन ऊसगाळप केले. त्याला 3020 रुपये दर दिला आहे. एफआरपीचे 2867 रुपये पूर्वीच वर्ग केले असून, 3020 पैकी 50 रुपये भागविकास निधी वजा जाता उर्वरित प्रतिटन 103 रुपये तसेच ठेवींवरील व्याज आणि कामगार बोनससह कामगारांच्या पगारवाढीतील फरक दीड कोटीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी वर्ग करणार आहोत. 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे.
गेल्या हंगामात विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षी पहिल्या दिवसापासूनच 8500 टनांनी गाळप करणार आहोत. चालू हंगामही जवळपास 200 दिवस सुरू राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी पार पाडू, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या शैक्षणिक संकुलातून चांगले शिक्षण व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.