पिंपरी : मांजा गळ्याला कापल्याने दुचाकीस्वार जखमी | पुढारी

पिंपरी : मांजा गळ्याला कापल्याने दुचाकीस्वार जखमी

पिंपरी ;  पुढारी वृत्तसेवा  : गळ्याला पतंगाचा मांजा कापल्याने दुचाकीवर जात असलेल्या पोलिस महिलेचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी रस्त्यावर घडली. कैलास पवार (वय ५२, रा. पोलिस वसाहत, भोसरी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे आपल्या दुचाकीवरून लांडेवाडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांच्या गळ्याला काहीतरी चावल्याचा भास झाला. दुचाकी बाजूला घेऊन त्यांनी गळ्याला हात लावला असता रक्ताची धार लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पवार यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी स्वतः चालवत घरी नेली. घरी गेल्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी देखील पवार यांना दाखल करून घेत उपचार सुरू केले. पवार यांच्या गळ्याला खोलवर जखम झाली असून तब्बल आठ टाके घालण्यात आले आहेत.

पवार यांनी खासगी कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, त्यांच्या पत्नी पिंपरी चिंचवड येथील पोलिस आयुक्तलयात नेमणुकीस आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.

Back to top button