पुणे महापालिका निवडणूक : प्रदेश काँग्रेसला हवीय इच्छुक उमेदवारांची यादी | पुढारी

पुणे महापालिका निवडणूक : प्रदेश काँग्रेसला हवीय इच्छुक उमेदवारांची यादी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ( पुणे महापालिका निवडणूक ) प्रदेश काँग्रेसने थेट इच्छुक उमेदवारांची यादी मागविली आहे. एकीकडे महापालिका निवडणुका वेळेवर होणार का ? आणि झाल्यास आघाडी होणार की नाही यासंबंधीचा निर्णय झाला नसताना प्रदेशाध्यक्षांनी थेट इच्छुक उमेदवारांची यादीच मागविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर थेट शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना डावलल्याची भावना यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका ( पुणे महापालिका निवडणूक ) आगामी काळात होणार आहेत. या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अखेरपर्यंत हा स्वबळाचा नारा कायम राहणार की आचार संहिता लागू झाल्यावर काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढविणार असा प्रश्न पडला आहे. त्यातच आता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना पत्र पाठवून आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग आणि वॉर्ड यामधील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवावी असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या पत्रात या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वी अशा पध्दतीने काँग्रेसने ( पुणे महापालिका निवडणूक ) थेट प्रदेशकडे इच्छुक उमेदवारांची यादी दिली नव्हती आणि प्रदेशने अशी यादी मागविली नव्हती. ही सर्व प्रक्रिया स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या पातळीवर पार पडली जात होती. आता मात्र प्रदेशने ही यादी मागविल्याने नक्की कोणाला शह देण्याचे उद्योग सुरू आहेत, असा प्रश्न काँग्रेसमधून उपस्थित केला जात आहे. त्यातच अद्याप प्रभाग रचना जाहीर झालेली नाही, आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे अद्याप निवडणूक लढायची की नाही या संभ्रमात अनेक इच्छुक आहेत. त्यातच प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी मागविल्याने इच्छुक उमेदवारांपुढे ही प्रश्न उपस्थित झाला आहे.

इच्छुकाकडून नावे मागविणार ( पुणे महापालिका निवडणूक )

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता प्रदेश कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार इच्छुक उमेदवारांची यादी पाठविली जाईल असे स्पष्ट केले. त्यासाठी आता प्रत्येक प्रभाग निहाय इच्छुकांकडून नावे मागविणार असल्याचेही बागवे यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button