

पिंपरी : शहराला चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून अतिरिक्त 100 एमएलडी पाणी दिले जाणार आहे. लवकरच केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे हाउसिंग सोसायट्यांना अधिकचे पाणी देण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. 30) सांगितले.
फेब्रुवारी 2023 नंतर 100 एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन
निघोजे बंधारावरून पाणी उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणून शुद्ध केले जाते. तेथून ते केंद्राच्या परिसरातील भागात पुरविले जाणार आहे. सुरुवातीला 100 पैकी 40 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारी 2023 नंतर 100 एमएलडी पाणी पुरविले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे नियोजन आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भातील सर्व कामे पूर्ण होऊन महिना झाला. केवळ उद्घाटन होत नसल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याबद्दल विचारले असता आयुक्त बोलत होते.
पवना जलवाहिनीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक
पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अनेक वर्षांपासून ठप्प आहे. तो प्रकल्प पुन्हा सुरू करण्याबाबत महापालिकेकडून हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्या संदर्भात बैठक घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
शालेय पोषण आहाराबाबत होणार कडक कारवाई
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी अनेक मुख्याध्यापकांनी केल्या आहेत. राजकीय दबावामुळे आहार पुरविणार्या संस्थांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जात नाही. या संदर्भात 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्याबाबत विचारले असता, आयुक्त म्हणाले की, याप्रकरणी दोषी संस्थेवर कडक कारवाई केली जाईल.
शहराला लवकरात लवकर अतिरिक्त पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी चिखली केंद्राचे उद्घाटन करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. ते पाणी शहराला मिळाल्यानंतर पवना खोर्यातील भागात 100 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. सोसायट्यांना प्रति माणसी 90 लिटरऐवजी 140 लिटर पाणी देण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
– शेखर सिंह, आयुक्त