शंभर दिवसांनंतरही जनरल मोटर्स कामगारांचे प्रश्न जैसे थे

शंभर दिवसांनंतरही जनरल मोटर्स कामगारांचे प्रश्न जैसे थे
Published on
Updated on

वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे एमआयडीसीमधील जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात उद्योग मंत्र्यांसह अनेक नेते, खासदार, आमदार येऊन गेले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या, अधिवेशनातही मुद्दा गाजला. परंतु, आजही कामगारांचा प्रश्न मिटलेला नाही.

राज्य सरकारचा केला निषेध

जनरल मोटर्स कंपनीचे सुमारे 1 हजार कामगारांनी आपल्या कुटुंबासह कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून वडगाव मावळ येथे मुंबई-पुणे महामार्गावर एमआयडीसी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला 100 दिवस पूर्ण होऊनही राज्य सरकारला कामगारांचे प्रश्न सोडवून आंदोलन थांबवता आले नाही. याबाबत कामगारांनी राज्य सरकाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी; प्रश्न मात्र प्रलंबितच

गेल्या 100 दिवसांत उद्योगमंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रूपाली चाकणकर, छत्रपती संभाजीराजे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खासदार श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, रोहित पवार, सचिन साठे, बी. जी. कोळसे पाटील, मनोज जरांगे, अजित गव्हाणे, मानव कांबळे, सचिन सावंत, आमदार कैलास पाटील, नाना काटे, मेघा पाटकर, रुपाली ठोंबरे, शंकर जगताप अशा सर्वपक्षीय नेत्यांनी भेटी दिल्या. परंतु, आजतागायत कामगारांना न्याय मिळू शकला नाही.

न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष

अडीच वर्षांपूर्वी जनरल मोटर्स कंपनीने कारखाना बंद केला व कंपनीत कायमस्वरुपी असणार्‍या कामगारांना नोटीस देऊन कामावरुन कमी केले. यासंदर्भात कामगार संघटनेने न्यायालयात दावा दाखल केला असून दावा चालू असताना, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून राज्य सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. कामगारांनी हुडांई कंपनीत काम द्या व इतर मागण्यांसाठी कुटुंबासह साखळी उपोषण सुरू केले. परंतु, कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे.

या शंभर दिवसांच्या काळात अनेक मान्यवर, कामगार नेते उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासोबत बैठका घडवून आणल्या. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वतः उपोषणस्थळी येऊन गेले. आंदोलनाला 50 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी चक्क स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पत्र सरकारला पाठवून कामगार मंत्र्यांच्या प्रतिमेला रक्ताने अभिषेक घालून निषेध व्यक्त केला. परंतु, अजूनही कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने संबंधित कामगारांचे आजही कुटुंबासह साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news