वादळाने 100 एकर केळीला फटका

वादळाने 100 एकर केळीला फटका

बावडा : पुढारी वृत्तसेवा : बावडा (ता. इंदापूर) परिसरात बुधवार, दि. 15 मे व मंगळवार दि. 21 मे अशा दोनवेळा झालेल्या जोरदार वादळी पावसाने सुमारे 100 एकर केळी क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त केळी बागांचे महसूल, कृषी विभागांनी पंचनामे पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यासाठी अहवाल पाठवून दिले आहेत.

केळीचे पीक हे कमकुवत असल्याने जोरदार वार्‍यापुढे तग धरू शकत नाही, त्यामुळे वादळी वार्‍याचा सर्वात जास्त फटका हा केळीच्या बागांना बसतो. बावडा गावातील रत्नप्रभादेवीनगर, जीवननगर आदी परिसरातील अनेक केळीच्या बागा वादळाने भुईसपाट झाल्या.
त्यामुळे शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नप्रभादेवीनगर परिसरात ऐन उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी आणून जगवलेली जयवंत आगलावे व सुभाष आगलावे या बंधूंची एकूण 5 एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या बंधूंचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे बावडा, पिठेवाडीतील अनेक केळी उत्पादक शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त केळी बागांचे बावड्याचे तलाठी अमोल हजगुडे, कृषी सहायक ए. ए. अडसूळ, गौतम गायकवाड यांनी पंचनामे केले. दरम्यान, शेतकर्‍यांनी वार्‍यापासून केळीच्या बागेच संरक्षण व्हावे म्हणून बागेच्या चारी बाजूंनी शेवरीची झाडे लावावीत, त्यामुळे काही प्रमाणात बागेचे संरक्षण करता येते, असे कृषितज्ज्ञ किशोर घोगरे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news