थकबाकी 10 हजार कोटींवर; महावितरणच्या पुणे विभागातील चित्र, वसुलीचे आव्हान
पुणे; पुढारी वृत्तसेवा : महावितरण वीज कंपनीच्या पुणे प्रादेशिक विभागातील 32 लाख वीज ग्राहकांकडे 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरण विभागातील अधिकार्यांपुढे आहे. पुणे प्रादेशिक विभागात पुण्यासह सातारा,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. या काळात नागरिकांकडे कोणतेही काम नव्हते. मात्र, वीज सुरूच होती. कोरोनाच्या कालखंड संपल्यानंतर वीज कंपनीने वीजग्राहकांकडून थकित वीजबिल वसूल करण्यास सुरूवात केली. मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे ग्राहकांकडील वीजबिलांची थकबाकी वाढत गेली.
32 लाख वीज ग्राहकांकडे 10 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकित आहे. त्यामुळे महावितरणला आर्थिक ताळमेळ बसविण्यात खूप अडचणी येत आहेत. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
कृषी पंप ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी
या थकबाकीत सर्वांत मोठा आकडा हा कृषीपंप ग्राहकांचा आहे. सुमारे साडेबारा लाख कृषीपंप ग्राहकांकडे 7 हजार 900 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची थकबाकी 390 कोटी रुपये तर पथदिव्यांची थकबाकी 1400 कोटी रुपये आहे. सुमारे 17 लाख 34 हजार घरगुती वीज ग्राहकांकडे 240 कोटींची थकबाकी आहे. एक लाख 78 हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे 74 कोटींची थकबाकी आहे. सुमारे 45 हजार औद्योगिक ग्राहकांकडे 115 कोटींची थकबाकी आहे.

