

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 'जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियानांतर्गत सव्वादोन कोटी मुलांची तपासणी झाली असून, 10 लाख बालके आजारी असल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी 7 लाख बालकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 3 लाख मुलांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख मुलांची तपासणी झाली आहे.
राज्यात 23 जानेवारीपासून 'जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. तपासणीसाठी सुमारे 12 हजार पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथकांद्वारे शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या आदी ठिकाणी 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 15 लाख बालकांची तपासणी करण्यात आली आहे.
नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी अशा संशयित रुग्णांना ओळखून उपचारांच्या दृष्टीने पावले उचलणे, ऑटिझम, विकासात्मक विलंब आदींसाठी डीआयईसी येथे उपचार सुरू करणे आणि किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक आणि मानसिक आजार शोधून आवश्यकतेनुसार उपचार पुरवण्यात येत आहेत.
राज्यातील 95 हजार 475 शाळा आणि 95 हजार 582 अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 15 लाख 24 हजार 58 बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 0 ते 6 वयोगटातील 64 हजार, 6 ते 10 वर्षे वयोगटातील 66 हजार आणि 10 ते 18 वर्षे वयोगटातील 85 हजार जणांचा समावेश आहे.
पथके : 270
भेट दिलेल्या शाळा : 5245
अंगणवाड्या : 4328
0 ते 6 वर्षे : 2,82,881
6 ते 10 वर्षे : 3,04,424
10 ते 18 वर्षे : 4,73,506
एकूण : 10,60,811