खडकवासला धरणाच्या पाण्यावर 1.2 मेगावॉट वीज प्रकल्प

खडकवासला धरणाच्या पाण्यावर 1.2 मेगावॉट वीज प्रकल्प
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना, कामगारांची वानवा, संबंधित कंपनीला कामासाठी शासनदरबारी परवानगीसाठी करावी लागणारी कसरत अशा विविध कारणांनी खडकवासला धरणावर उभारण्यात येणारा वीजनिर्मिती प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मुठा उजवा कालव्यातून सिंचनासाठी सोडल्या जाणार्‍या पाण्यातून 1.2 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणार्‍या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याबाबत 2006 मध्ये राज्य शासनाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पात 600 किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे 1.2 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर एका कंपनीला दिले आहे. या कंपनीने डिसेंबर 2010 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास कंपनीला परवानगी दिली गेली नाही.

कोरोनामुळे दीड-दोन वर्षे प्रकल्पाच्या कामात खंड पडला, त्यानंतर कामगारांची वानवा आणि विविध परवानग्या यांमुळे प्रकल्पाचे काम रखडले होते. नुकतेच प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, त्याची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्याकडून परवानगी घेण्यात येत असून, लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वीजनिर्मितीला सुरुवात होणार असून, सुमारे 800 ते 1000 घरांना वीज पुरेल, एवढी वीजनिर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या ठिकाणी पॉवर हाऊस बांधण्यात आले. या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर आता खडकवासला धरणातूनही वीजनिर्मिती केली जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news