

पुणे: पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी कर्मचार्यांची नेमणूक केल्याने पंधराशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम लांबणीवर पडणार आहे. हे सर्वेक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या वतीने नागरी सुविधांसाठी समाजमंदिरे, व्यायामशाळा, बहुद्देशीय भवन, अभ्यासिका, विरंगुळा केंद्र, योगा केंद्र, हॉस्पिटल्स, शाळांच्या इमारती व वर्गखोल्या, क्रीडा संकुले, भाजी मंडई, जलतरण तलाव आदींची उभारणी करण्यात येते.
पंधराशे चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्या मिळकती किंवा इमारतीचा ताबा भवन विभाग, मालमत्ता विभागाकडून संबंधित विभागाकडे हस्तांतरित केला जातो. मात्र, पंधराशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणार्या मिळकती आणि इमारतींचा ताबा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे असतो. अशा किती इमारती आहेत, त्यांचा काय वापर सुरू आहे, याची माहिती प्रशासनाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविली होती. क्षेत्रीय कार्यालयांच्या ताब्यात 438 इमारती असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. तसेच या मिळकतींचा सद्य:स्थितीत काय वापर केला जात आहे, याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.
मात्र, महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत क्षेत्रीय कार्यालयांचाही समावेश केला आहे. या कार्यालयातील कर्मचारी या कामात गुंतले आहेत. यानंतरही निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्यांची गरज भासणार आहे. निवडणुकीच्या कामासंदर्भात होणार्या बैठका आणि इतर कामांमुळे सर्वेक्षणासाठी कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, त्यामुळे सर्वेक्षणाला निवडणुकीनंतरच मुहूर्त मिळणार आहे.