

धायरी : पुढारी वृत्तसेवा : कारवाई होऊनही अनधिकृतपणे पुन्हा रेडिमिक्स सिमेंट काँक्रीट प्रकल्प सुरू करणार्या वडगावातील व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश दिले असल्याची माहिती पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल तिखे यांनी दिली.
वडगाव परिसरात अनधिकृत रेडिमिक्स सिमेंट काँक्रीट प्रकल्प सुरू असून, त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे वृत्त दै. पुढारीने दिल्यानंतर पालिका प्रशासनाकडून या प्रकल्पावर काही दिवसांपूर्वीच कारवाई करून येथील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. कारवाई होऊन काही कालावधी लोटताच पुन्हा येथे हे प्रकल्प मूळ धरू लागले आहेत.
त्याबाबत दै. पुढारीकडून सर्वेक्षण केले असता चार प्रकल्पापैकी एक प्रकल्प अजूनही बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून आले. हे प्रकल्प सुरू होण्यामागे काही राजकीय लोकांचे लागेबांधे असल्याचेही निदर्शनास आले. अनधिकृत रेडिमिक्स प्लांट बंद करण्यात यावे, अन्यथा पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येऊन अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील, अशी नोटीस पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने या प्लांट मालकांना देण्यात आलेली आहे.
पुन्हा त्यांना नोटीस देण्याची गरज नसल्याचे महापालिका अधिकारी तिखे यांनी सांगितले. या अनधिकृत प्लांटवर पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाच्या झोन क्र. 2 च्या वतीने कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल तिखे, बांधकाम निरीक्षक धनंजय खोले यांच्या पथकाने कारवाई केली होती.