

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'बाईच्या लिहिण्यात लैंगिक उल्लेख आले की ती लेखिका बोल्ड लिहिते, असे म्हटले जाते. असे म्हणणे हा त्या लेखिकेचा केलेला अपमानच आहे,' असे मत लेखक राजन खान यांनी व्यक्त केले. 'गौरी देशपांडे, मेघना पेठे यांच्यासह काही लेखिकांचे लिखाण आपण बोल्ड कॅटेगरीत टाकले. प्रत्यक्षात ते बोल्ड नसून मानवी आहे, असेही खान यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभू ज्ञान मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे, 'मिळून सार्याजणी'च्या संपादिका गीताली वि. म., 'रिंगण'चे संपादक सचिन परब, लेखक प्रतीक पुरी आदी उपस्थित होते.
खान म्हणाले, 'त्यांच्या लिखाणाला बोल्ड म्हणणे हा त्यांचाही अपमानच होता. सध्याच्या मानवी जगाचं वास्तव विक्राळ रूप आपण अनुभवतो आहोत. नातेसंबंधांमध्ये यांत्रिकपणा, खोटेपणा आलाय, हे मानवी वास्तव आहे. हे वास्तवच लेखक आपल्या लिखाणात टिपतो. लेखकानं लिहिण्यातून केलेली नोंद ही भविष्यात येणार्या नव्या पिढ्यांना दिशादर्शक ठरते, त्या अर्थानं लिहिणं ही त्या त्या काळाची महत्त्वाची नोंद ठरते.'
गीताली वि. म़. म्हणाल्या, 'बाईपणा आणि पुरुषपणाचा घट्ट साचा चुकीचा आहे; तसेच स्त्री-पुरुषांच्या बाबतीत एकरूप हा शब्दही चुकीचा वाटतो. एकमेकांना समजून घेणं ही बाजू त्यात असेल, तर माणूस म्हणून आपण चांगली वाटचाल करू शकतो.' प्रतीक पुरी यांनी अमृता देसर्डा यांच्या कथांवर भाष्य केले. तेजस्विनी गांधी यांनी निवेदन केले.