

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दरोड्याच्या तयारीत असलेल्या झारखंड राज्यातील टोळीमधील दोघांना लोणीकंद पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे तीन साथीदार मात्र फरार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून अॅपल कंपनीचे 197 मोबाईल, तीन लॅपटॉप, 7 आयपॉड व इतर अॅक्सेसरीज असा तब्बल 1 कोटी 53 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अब्दुल हाय अबुजार शेख (वय 20), अबेदुर मुफजुल शेख (वय 34), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
त्यांचे फरार साथीदार सुलताना अब्दुल शेख (वय 32), अबुबकर अबुजार शेख (वय 23), राबीवुल मुंटू शेख (वय 22, सर्व रा. जि. साहेबगंज, झारखंड) यांच्यावर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी 24 जुलै रोजी वाघोली येथील प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमधून अॅपल कंपनीचे मोबाईल, लॅपटॉप व इतर साहित्य चोरी केल्याचे सांगितले. गोडाऊनच्या वरील सिमेंटचा पत्रा फोडून ही चोरी करण्यात आली होती. चोरीचे सर्व साहित्य
आंबे विक्रीच्या बहाण्याने रेकी
आरोपी अब्दुल हा आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने अगोदर पुण्यात आला होता. त्याला पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराची व्यवसायानिमित्त माहिती झाली होती. त्यातूनच त्याने चोरी करण्याच्या ठिकाणांची रेकी केली. त्यानंतर तो त्याच्या झारखंड येथील गावी गेला होता. तेथून येताना तो त्याच्या इतर साथीदारांना सोबत घेऊन आला. पकडले जाण्यापूर्वी म्हणजे 24 जुलै रोजी त्यांनी वाघोलीतील मोबाईलच्या गोडाऊनवर डल्ला मारला होता. त्यानंतर एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारी होते. त्यानंतर ते गावी पळ काढणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेले दोघे आरोपी झारखंड राज्यातील आहेत. दरोड्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाघोलीतील गोडाऊनमधून चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार चोरीचा दीड कोटीपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे