

गणेश खळदकर
पुणे : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची वल्गना जिल्हा परिषद प्रशासनाने केली होती; परंतु जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: उधारीवर गणवेश आणून वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समग्र शिक्षा किंवा जिल्हा परिषदेकडून अद्याप एक छदामही आला नसल्याची माहिती एका शाळेच्या मुख्याध्यापकाने दिली आहे. यंदा पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही निधी हा समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तर काही निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
परंतु, तब्बल दीड महिना होत आला तरी शाळांकडे गणवेशाचा निधीच आलेला नाही. विद्यार्थी शाळेत गणवेशात यावेत, यासाठी मुख्याध्यापकांनी गणवेश विक्रेत्यांकडून उधारीवर एक गणवेश आणून विद्यार्थ्यांना दिला आहे. लवकरच (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन जवळ येत आहे. त्यादिवशी तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून तत्काळ निधी मिळावा, अशी मागणी अनेक शाळांचे मुख्याध्यापक करत आहे. तर जिल्हा परिषदेकडून मात्र निधी वाटपासाठी तांत्रिक कारण दिले जात आहे.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्यात 2022-23 मध्ये 35 लाख 92 हजार 921 लाभार्थ्यांकरिता 215 कोटी 57 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील साडेनऊ कोटी रुपये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. तसेच समग्र शिक्षा योजनेत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास चार कोटी रुपयांची तरतूद जिल्हा परिषद करणार आहे. मात्र, अनेक शाळांना दोन्ही योजनांचा कोणताही निधी मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी 1 लाख 58 हजार 219
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मंजूर निधी 9 कोटी 49 लाख 31 हजार 400
जिल्हा परिषद निधीतून गणवेश पात्र विद्यार्थी 86 हजार 600
जिल्हा परिषद निधीतून गणवेशासाठी निधी 3 कोटी 98 लाख 36 हजार
एकूण गणवेश पात्र विद्यार्थी 2 लाख 44 हजार 819
गणवेशासाठी एकूण मंजूर निधी 13 कोटी 47 लाख 67 हजार
समग्र शिक्षा तसेच जिल्हा परिषदेकडून गणवेशासाठी मिळणारा निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे उधारीवर गणवेश आणून विद्यार्थ्यांना वाटला आहे. परंतु, 15 ऑगस्ट जवळ आला असून, विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर निधी मिळणे गरजेचे आहे.
– एक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, दौंड तालुकाविद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे वाटप करण्याचे काम सुरू आहे. पाच तालुक्यांचे पैसे वाटप पूर्ण झाले आहे. इतर तालुक्यांचे शिल्लक आहेत, मात्र ते लवकरच पूर्ण होईल. बँकेमधून पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाशी मी संपर्कात असून, लवकरात लवकर सर्व पैसे शाळांना देण्यात येतील.
– संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद