

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. तसेच शेतकर्यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये असून, एकूण देय रकमेच्या हे प्रमाण 3.16 टक्क्यांइतके आहे.
साखर आयुक्तालयाच्या 15 जुलैअखेरच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते. उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे तथा एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्यांना देण्यात आलेले आहेत. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे.
राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 80 ते 99 टक्के रक्कम देणारे 99 कारखाने आहेत. तर 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी आणि शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलेली आहे. म्हणजेच अद्यापही 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे.
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत. त्यामध्ये चार सहकारी आणि एका खासगी कारखान्याचा समावेश आहे. त्यांच्याकडे 120 कोटी 37 लाख रुपयांइतकी एफआरपीची रक्कम थकीत आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 हंगामातील उसाच्या एफआरपीची जेमतेम तीन टक्के रक्कम शेतकर्यांना देणे बाकी आहे. त्यामध्ये काही कारखान्यांकडील थकीत रकमेचा आकडा जास्त आहे. ती रक्कमही संंबंधित कारखान्यांनी लवकर देण्यासाठी साखर आयुक्तालय प्रयत्नशील आहे.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.
जिल्हा साखर कारखाना रक्कम
1. सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, 36 कोटी 74 लाख 90 हजार रुपये
2. पुणे राजगड सहकारी, निगडे, ता. भोर 25 कोटी 91 लाख 69 हजार रुपये
3. बीड अंबाजोगाई सहकारी, ता. अंबाजोगाई 8 कोटी 14 लाख 15 हजार रुपये
4. बीड वैद्यनाथ सहकारी, ता. परळी 46 कोटी 15 लाख 75 हजार रुपये
5. उस्मानाबाद जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी, खासगी 3 कोटी 40 लाख 69 हजार रुपये