‘जीएमआरटी’ 18 देशांच्या दुर्बिणीची मार्गदर्शक

‘जीएमआरटी’ 18 देशांच्या दुर्बिणीची मार्गदर्शक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेडिओ खगोलशास्त्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगभर नाव नेणार्‍या पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपला (जीएमआरटीला) 'आयईईई माईलस्टोन'च्या मान्यतेबरोबर 18 देश मिळून उभी करीत असलेल्या 'स्क्वेअर किमी अरेंज' या दुर्बिणीची मार्गदर्शक, असा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुण्याचे नाव जगभरातील संशोधकांच्या यादीत गेले आहे. केंद्राचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी यांनी माहिती देताना सांगितले, की जीएमआरटी ही इंटरफेरॉमीटर या प्रकारात मोडणारी व तिच्या ठराविक वैशिष्ट्यांमुळे जगातील एक मोठी रेडिओ दुर्बीण म्हणून ओळखली जाते.

रेडिओखगोलशास्त्राचे जनक दिवंगत प्रा. गोविंद स्वरूप यांनी त्या वेळी संकल्पना मांडून हे केंद्र अस्तित्वात आणले होते.
रेडिओ खगोलशास्त्राची गरज व संशोधकांचा वाढता संपर्क बघता भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारलेले हे जगातील सर्वांत मोठ्या दुर्बिणीच्या केंद्राचे काम 1996 मध्ये पूर्ण झाले. पुण्यापासून जवळ असलेल्या खोडद येथे 'जीएमआरटी ' मोठ्या डौलात उभी आहे.

जगभरातील संशोधकांसाठी असलेली ही संस्था 2001 मध्ये खुली करण्यात आली. मागील वीस वर्षांपासून सर्वांत मोठ्या दुर्बिणींबाबत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन केले जात आहे. जगातील 45 पेक्षा जास्त देश 'जीएमआरटी'ची मदत घेऊन संशोधन करीत आहेत. याच संशोधनाच्या बळावर 18 देश मिळून उभी करीत असलेल्या दुर्बिणीची मार्गदर्शक, असा दर्जा संस्थेला बहाल करण्यात आला आहे.

या कारणामुळे सन्मान व प्रशस्तिपत्र
'जीएमआरटी' ही नवीन दुर्बिणीची रचना, संग्रहाची यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर संदेश वहन क्षेत्रातील आद्यप्रवर्तक आहे. ब—ह्मांडाला समजून घेण्यासाठी जीएमआरटीने पल्सार, महाविस्फोट (सुपरनोव्हा), आकाशगंगा, क्वासार आणि विश्वविज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. याच संशोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून प्रशस्तिपत्र बहाल करण्यात आले.

ब्रह्मांडातील घटकांचाच अभ्यास
भारतीय तंत्रज्ञानाच्या पद्धतीने प्रकट झालेल्या 'जीएमआरटी'च्या दुर्बिणीची जगातील 50 पेक्षा जास्त देश संशोधनासाठी मदत घेत आहेत. आकाशगंगेतील दृश्य स्वरूपाच्या निरीक्षणाच्या मर्यादेवर प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने या संस्थेने मात केली आहे. दुर्बिणीच्या मदतीने संशोधक आकाशगंगा, आकाशगंगेतील समूह, स्पंदके, घडणारे बदल, सूर्याचे अचूक निरीक्षण असे वेगवेगळे संशोधन करून त्याचा डाटा गोळा करीत आहे. 'जीएमआरटी' ने 5 ते 6 लाख 'ऑब्जेक्ट'च्या प्रतिमा जगाला दिल्या आहेत.

पाच देशांनी घेतली मदत
जीएमआरटी आणि युरोपियन व्हीएलबीआय नेटवर्क (ईव्हीएन) मधील काही दुर्बिणीसह केलेल्या दोन समन्वित प्रयोगामध्ये व्हेरी लाँग बेसलाइन इंटर फेरोमेट्रीद्वारे यशस्वीरीत्या फ्रिंज शोधण्यात आले. या बहुद्देशीय प्रयोगात जीएमआरटी मेडिसीना व नाटो (इटली), वेस्टरबोर्के (नेदरलँड), झेलेनचुकस्काया (रशिया) या देशांच्या पाच दुर्बिणींनी भाग घेतला.

महाकाय अँटिनाची अशी आहे रचना
विस्तार 30 किलोमीटर, एका अँटीनाचा व्यास 45 मीटर, उंची 40 मी, अँटिनांची संख्या : 30, लहरी संग्रहित : 110 ते 1460 मेगाहर्ट्स. 'जीएमआरटी'च्या खोडद येथील केंद्रात 30 मोठे अँटिना एकमेकांशी जोडलेले आहेत. एक अँटिना 12 मीटर बेसवर बसवण्यात आला असून, त्याचे 110 टन वजन आहे. या अँटिनावर स्टेनलेस स्टील 1 सेंमी जाडीचा रिसिव्हर बसवण्यात आला आहे. या अँटिनातून तार्‍यांचा जन्म, तार्‍यांचा मृत्यू व यातून तयार होणारा सुपरनोव्हा, हायड्रोजन, ब्लॅकहोल, रिजेन, गॅलेक्सिस यांचा एकत्रित अभ्यास करून संशोधन केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news